Tue, Apr 23, 2019 09:52होमपेज › Pune › महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढले : अजित पवार

महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढले : अजित पवार

Published On: Feb 12 2018 2:04AM | Last Updated: Feb 12 2018 12:48AMपुणे  :  प्रतिनिधी

कर्करोगावर मोठे संशोधन झाले आहे. पहिल्या टप्प्यात आणि योग्य वेळेत निदान झाल्यास कर्करोगावर मात करता येऊ शकते. मात्र, जाणीव व जागृतीअभावी महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. व्यसनमुक्ती, सकस आहार, डॉक्टरांच्या सल्ल्याने कर्करोग दूर ठेवता येतो, असे मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्या वतीने स्वर्गीय आर. आर. पाटील कॅन्सर साक्षर व कॅन्सरमुक्ती अभियानाचे उद्घाटन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते, आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. दिलीप माने उपस्थित होते.

पवार म्हणाले, पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने उपलब्ध केलेल्या विविध सोयी-सुविधांमुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कर्करोगावरही मात करता येऊ शकतेे. देशात सर्वाधिक कर्करुग्ण मिझोराम राज्यात आढळून येतात. बदलत्या शैलीमुळे तसेच व्यसनामुळे महाराष्ट्र राज्याचा क्रमांक सर्वात आधी लागण्याची भीती पवार यांनी व्यक्त केली.

डॉ. दिलीप माने म्हणाले, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राद्वारे रुग्णांवर उपचारास प्राधान्य दिले जाते. शारदा ग्राम आरोग्य योजना, प्रतिभा आरोग्य योजनाद्वारे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. जन्मदरात केरळ राज्यानंतर पुणे जिल्ह्याचा क्रमांक लागतो. जिल्हा परिषदेच्या उपक्रमामुळे जिल्ह्यात मृत्युदराचा आकडा 12 आहे. उत्कृष्ट कामगिरीबद्दल आरोग्य केंद्रातील डॉक्टर, परिचारिका, वाहनचालक, एनआरएचएममधील कामगारांचा  त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन आशिष जराड यांनी केले. 

मुलींमधील व्यसनाधिनता वाढली

बदललेल्या जीवनशैलींमुळे मुलींमधील व्यसनाधिनता वाढू लागली आहे. विशेषतः शहरातील ‘कार्ट्या’ बिनधास्तपणे सिगारेट ओढतात. ठराविक वयात आणि चुकीच्या मित्र  रिवारामुळे दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढत आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, जीवनशैली बदलल्यामुळे अनेकांकडून चक्क आनंदात, दुःखात, विजयात आणि मूड नसताना दारू ‘टाकली’ जाते. ग्रामीण भागात पोलिसांना सापडणार नाही, असे दारूचे गुत्ते टाकणारे लगेच आढळून येतात. तंबाखू, दारू, सिगारेटमुळे राज्यात कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत. हुक्का पार्लरमुळे तरुण पिढीचे नुकसान होत आहे. एक हुक्का 100 सिगरेटचा धूर सोडतो. त्यामुळे निर्व्यसनी नागरिकांनाही दुष्परिणाम भोगावे लागतात.