Fri, Apr 26, 2019 03:39होमपेज › Pune › धायरीमध्ये साडेसात लाखांची घरफोडी

धायरीमध्ये साडेसात लाखांची घरफोडी

Published On: Dec 14 2017 2:16AM | Last Updated: Dec 14 2017 1:24AM

बुकमार्क करा

पुणे / धायरी : प्रतिनिधी 

घरातील हॉलजवळ असलेल्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी घरातील हॉल, बेडरूम आणि किचनमध्ये असलेल्या लोखंडी व लाकडी कपाटातील रोख रक्कम, सोन्या- चांदीचे दागिने, असा साडेसात लाख रुपये किमतीचा ऐवज चोरी केला. ही घटना मंगळवारी दुपारी एक ते रात्री एकदरम्यान घडली. 

याप्रकरणी योगेश बाळासाहेब रायकर (35, रायकरनगर, धायरी) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायकर हे धायरी येथील रायकरनगरमध्ये गल्ली क्रमांक 20/ब मध्ये राहण्यास आहेत. त्यांच्या पुतण्याचे लग्न असल्याने ते मंगळवारी दुपारी घराला कुलूप लावून सासवडला गेले होते. लग्न समारंभ संपवून ते रात्री आठ वाजता घरी परतले.

त्या वेळी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी आत प्रवेश करीत हॉल, बेडरूम,  किचनमध्ये ठेवलेली रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, असा साडेसात लाखांचा ऐवज लंपास केल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सिंहगड पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) बबन खोडदे करीत आहेत.