Fri, Apr 26, 2019 03:51होमपेज › Pune › बिल्डर खून: ठाण्यातून एकाला अटक

बिल्डर खून: ठाण्यातून एकाला अटक

Published On: Jan 24 2018 1:47AM | Last Updated: Jan 24 2018 1:38AM पुणे  :प्रतिनिधी

प्रभात रस्त्यावर झालेल्या बिल्डर देवेन शहा यांच्या खूनप्रकरणी डेक्कन पोलिसांनी ठाण्यातून एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून राहुल शिवतारे व रवींद्र चोरगे यांनी शहांवर ज्या पिस्तुलातून गोळ्या झाडल्या ते पिस्तूल, तसेच काडतुसे जप्त केली आहेत. तो पसार झालेला राहुल शिवतारे याच्या ओळखीचा असून, ठाण्यात गेल्यानंतर त्यांनी हे पिस्तूल त्याच्याकडे ठेवण्यास दिल्याचे समोर आले आहे. सुरेंद्र शामकेर पाल (वय 31, रा. आझादनगर, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणी रवींद्र सदाशिव चोरगे (वय 48, रा. अमृतनगर, माणिकबाग, सिंहगड रोड) याला पोलिसांनी रविवारी अटक केली होती. राहुल चंद्रकांत शिवतारे (वय 41, रा. वडगाव बुद्रुक) याचा अद्यापही पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही. 

गेल्या आठवड्यात मध्यरात्री  (शनिवारी, दि.13 जानेवारी) बिल्डर देवेन शहा यांचा रवींद्र चोरगे आणि राहुल शिवतारे यांनी गोळ्या झाडून खून केला होता. सीसीटीव्हीमध्ये हे दोघेही कैद झाले होते. 
या सीसीटीव्ही फुटेजच्या तपासातच पोलिसांकडून दोघांची नावे निष्पन्न झाली.  त्यानंतर पुणे पोलिस व गुन्हे शाखा गेल्या आठ दिवसांपासून या दोघांच्या मागावर होते. दरम्यान, रविवारी रवींद्र चोरगे याला डेक्कन पोलिसांनी जळगाव येथील एका हॉटेलमधून अटक केली. मात्र, त्याच्याकडून पोलिसांना ज्या पिस्तुलातून शहांवर गोळ्या झाडण्यात आल्या ते पिस्तूल आणि या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी मिळाली नव्हती. 

खून केल्यानंतर दोघे भोर, महाड, खोपोली, तसेच परत देहूरोड भागात फिरत होते. तेथून ते अक्कलकोट, ठाणे, मध्य प्रदेशातील इंदोर आणि बर्‍हाणपूर येथे गेले. बर्‍हाणपूरवरून चोरगे जळगाव येथे आला. तर, शिवतारे दुसरीकडे निघून गेल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यादरम्यान हे दोघे ठाण्यात गेले असता, त्यांनी पाल याच्याकडे पिस्तूल व काडतुसे ठेवली. तसेच, त्याला पुण्यात आम्ही एकाचा खून केल्याचेही सांगितले. तरीही त्याने दोघांकडील पिस्तूल आपल्याकडे सांभळण्यास घेतले.   

चोरगेला रविवारी अटक केल्यानंतर त्याच्याकडेे कसून चौकशी केली असता, त्याने गोळ्या झाडण्यात आलेले पिस्तूल राहुल शिवतारे याच्या ओळखीतील सुरेंद्र पाल याच्याकडे ठेवण्यात आल्याचे सांगितले. त्यानुसार डेक्कन पोलिसांनी मध्यरात्री आझादनगर येथून सुरेंद्र पाल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गोळ्या झाडण्यात आलेले दोन पिस्तूल, सात काडतुसे आणि एक मोकळी मॅगझिन जप्त केली आहे. राहुल शिवतारे व सुरेंद्र पाल यांची ओळख आहे. पाल हा जुगार अड्डा चालवीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याकडे चौकशी सुरू असून, शहा यांच्या खुनात अद्याप तरी त्याचा सहभाग नसल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.