Tue, Jun 18, 2019 23:29होमपेज › Pune › ब्लॅकमेल करणार्‍या प्रेयसीचा केला खून

ब्लॅकमेल करणार्‍या प्रेयसीचा केला खून

Published On: Mar 25 2018 1:51AM | Last Updated: Mar 25 2018 1:34AMपुणे  : प्रतिनिधी

प्रियकराला ब्लॅकमेल करून सतत पैशांची मागणी करणार्‍या प्रेयसीचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फिरण्यासाठी म्हणून तिला कारमध्ये घेऊन गेल्यानंतर कामगाराच्या मदतीने तिचा खून केला. त्यानंतर मृतदेह वाघजाई डोंगरातील झाडांमध्ये टाकून पेट्रोलने जाळण्यात आला. दहा दिवसांपासून गायब असल्याने वारजे माळवाडी पोलिसांकडून शोध सुरु होता. तपासात हा प्रकार समोर आला असून, प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. 

प्रेरणा शशिकांत कांबळे (वय 21, रा. शिवणे, वारजे माळवाडी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी प्रियकर विपुल भवरलाल शहा (वय 32, रा. गंगा भाग्योदय इमारत, माणिकबाग, सिंहगड रोड) याला अटक करण्यात आली आहे. तर, साथीदार लहू गोणते (रा. पौड रोड) हा पसार झाला असून, त्याचा शोध सुरु आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई राजेंद्र खामकर यांनी फिर्याद दिली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रियकर विपुल शहा याचा विवाह झालेला असून, त्याला एक मुलगा आहे. त्याचे वारजेत किराणा दुकान आहे. तर, लहू गोणते हा दुकानातील कामगार आहे. तरुणी एका फर्ममध्ये नोकरी करत होती.

त्यामुळे त्यांची ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. आरोपी विपुल हा तिला मागणीनुसार पैसेही पुरवत होता. काही महिन्यांपासून विपुल तिला टाळण्याचा प्रयत्न करत होता. तरूणी विपुलकडे अधून-मधून पैशांची मागणी करत. तसेच पैसे न दिल्यास पत्नीला प्रेम संबंधाबाबत सांगण्याची धमकी देत होती. दरम्यान गेल्या आठवड्यात (शनिवार, दि. 17 मार्च) विपुलने तरुणीला फिरायला जाण्यासाठी म्हणून फोन केला. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ती आल्यानंतर कारमधून विपुल, त्याचा कामगार लहू आणि प्रेरणा असे तिघेही गेले. त्यानंतर ते वाघजाई डोंगर भागत आल्यानंतर तेथे काही वेळ थांबले.

त्यावेळी प्रेरणांने विपुल याला तू माझ्यापासून लांब पळतो, अशी तक्रार केली. त्यावेळी विपुलने तू मला ब्लॅकमेल करतेस का, असे म्हणून वाद घातला. या वादातून विपुलने दोरीने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर दोघांनी तिचा मृतदेह झाडीत नेळून जाळला. दरम्यान प्रेरणा घरी न आल्याने आईने वारजे पोलिसांकडे धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक वाजीराव मोळे व त्यांच्या पथकाने तत्काळ तिचा फोनचे लोकेशन तपासले. त्यावेळी ते पौडच्या हद्दीत येत होते. तिचा फोन लागत होता. मात्र, उचलत नव्हते. दरम्यान दुसर्‍या दिवशी सकाळी (रविवारी, दि. 18 मार्च) आठ वाजण्याच्या सुमारास तिचा फोन बंद लागला. त्यानंतर पोलिसांनी परिसरात माहिती घेतली.

त्यावेळी प्रेरणा व विपुल याचे प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, विपुलला ताब्यात घेतले. दोन दिवस चौकशी केली. मात्र, तो माहिती देत नव्हता. पोलिसांनी खाक्या दाखवताच, त्यांने गुन्ह्याची कबूली देत, पोलिसांपुढे पुर्ण माहिती सांगितली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी प्रेरणा हिचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यानंतर खून व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून विपुलला अटक केली. दरम्यान हा प्रकार ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत घडल्याने झिरोने हा गुन्हा पौड पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात  आला आहे. 
 

 

tags : pune,news,boyfriend Blackmail his girlfriend and murder