होमपेज › Pune › बोगस कॉल सेंटरवर छापा

बोगस कॉल सेंटरवर छापा

Published On: Jan 14 2018 1:53AM | Last Updated: Jan 14 2018 1:27AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

अ‍ॅपल व आयपॉडवर वापरण्यात येणारे ब्राऊझर क्रॅश झाल्याचे सांगत अमेरिकन नागरिकांना गंडा घालणार्‍या पुण्यातील बोगस कॉल सेंटरवर सायबर सेलने पर्दाफाश केला. कॉल सेंटर चालविणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी जवळपास दोनशे नागरिकांना गंडा घालत दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, दोघांचेही पुण्यातील  नामांकित महाविद्यालयातून शिक्षण झालेले आहे. गेल्या चार महिन्यांपासून कॉल सेंटर सुरू असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती सायबर सेलचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली. 

रोहित रामलाल माथूर (वय 29, रा. बावधन) आणि आदित्य सदानंद काळे (वय 29, रा. खराडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांचा कुणाल फतवाणी हा साथीदार पसार झाला आहे. 
खराडी परिसरातील एका इमारतीत व्ही. टेक. सोल्युशन नावाने बोगस कॉल सेंटर सुरू आहे. ते अमेरिकन नागरिकांना त्यांच्या मोबाईलमधील व्हायरस काढून देण्याच्या बहाण्याने गंडा घालत आहेत, अशी माहिती सायबर सेलला मिळाली होती. त्यानुसार, सायबर सेलचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन पवार, सोनाली फटांगरे व त्यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. त्या वेळी पोलिसांनी रोहित माथुर व आदित्य काळे यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे तपास केला असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार, दोघांना अटक केली. त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये अशा प्रकारे 175 अमेरिकन नागरिकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. त्यांनी दहा लाख 50 हजार रुपयांना गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी या ठिकाणावरून 6 हार्डडिस्क, 1 लॅपटॉप, वायफाय राऊटर, 5 हँडसेट असा मुद्देमाल जप्त केला आहे. 
नामांकित महाविद्यालयात शिक्षण पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातून रोहित माथुर याचे बॅचलर इन इन्फोरेशन टेक्नॉलॉजी व आदित्य काळे याचे बॅचलर इन फॉरेन ट्रेड शिक्षण झाले आहे. रोहितने शिक्षणानंतर दिल्ली येथे दोन वर्षे नोकरी केली आहे. त्यानंतर तो पुण्यात आला. दोघेही हडपसर परिसरातील एका कंपनीत नोकरीला होते. तेथे दोघांची ओळख झाली. त्यानंतर त्यांनी ऑगस्ट 2017 पासून खराडीत भागीदारीमध्ये बोगस कॉल सेंटर सुरू केले व नागरिकांना गंडा घालण्यास सुरुवात केली.