Thu, Apr 25, 2019 11:56होमपेज › Pune › शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी 37 लाख खर्च

शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी 37 लाख खर्च

Published On: Jan 09 2018 2:04AM | Last Updated: Jan 09 2018 1:39AM

बुकमार्क करा
पुणे ः प्रतिनिधी 

महापालिकेद्वारे महापौर चषक स्पर्धेच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच आयोजित केलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी तब्बल 37 लाख 53 हजार रुपये खर्च करण्यात आला. स्पर्धेसाठी केल्या जाणार्‍या खर्चाची कोणतीही चर्चा होऊ नये म्हणून नियमांना डावलून देत या खर्चाला स्पर्धेनंतर मान्यता देण्यात आली. या खर्चाचा प्रस्ताव आयत्या वेळेस स्थायी समितीसमोर दाखल करून त्याला मान्यताही घेण्यात आली.  महापौर चषक स्पर्धेअंतर्गत महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. महापौर चषक स्पर्धांसाठी केल्या जाणार्‍या खर्चावरून अनेकदा वादंगही निर्माण झालेले आहेत. दरम्यान, सत्ताधारी भाजपच्या वतीने महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेत, या वर्षी महापौर चषक स्पर्धांमध्ये काहीही वाद निर्माण होणार नसल्याची ग्वाही देत स्पर्धा पारदर्शक पद्धतीने आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.

दरम्यान, महापौर चषक स्पर्धेत पहिल्या दिवसापासूनच शरीरसौष्ठव स्पर्धेला झुकते माप दिले होते. महापौर मुक्ता टिळक यांनी स्पर्धांमध्ये कोणत्या खेळांचा समावेश असणार आहे, याची माहिती देण्यापूर्वीच शहरातील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये फक्त शरीरसौष्ठव स्पर्धेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यासाठी विशेष म्हणजे सभागृह नेते भिमाले उपस्थित होते. महापौर चषक स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच शरीरसौष्ठव स्पर्धेचा समावेश करण्यात आला असल्याने पालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी याचे आयोजन आपल्याकडे 
घेतले होते.

महापालिकेला जिल्हा संघटनेने या स्पर्धेसाठी होणार्‍या खर्चाची माहिती 14 सप्टेंबरला कळविली होती. तसेच महापौर कार्यालयाने ही स्पर्धा घेण्याबाबत 20 डिसेंबरलाच पत्र दिलेले होते. दरम्यान, स्पर्धेसाठी होणारा खर्च जास्त असल्याने त्याला शहरातील स्वयंसेवी संस्थांनी विघ्न निर्माण करू नये, यासाठी स्पर्धा झाल्यानंतर या स्पर्धेसाठी झालेल्या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला. दरम्यान, या स्पर्धेची अधिकाधिक प्रसिद्ध व्हावी, यासाठी शहरात मोठ्या संख्येने जाहिरातीचे फ्लेक्स लावण्यात आले होते. पुणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या वतीने या स्पर्धेच्या आयोजनासाठी कोटेशन देण्यात आले होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध गटातील खेळाडूंना बक्षिसे, खेळाडूंना राहण्याची व्यवस्था, त्यांचा नाष्टा, जेवण, स्पर्धेसाठीचा मंडप यासाठी कोटेशन दिले होते.