Tue, Jul 23, 2019 02:25होमपेज › Pune › शरीरसौष्ठवपटू सुनीत जाधव हॅट्रीकसाठी सज्ज

शरीरसौष्ठवपटू सुनीत जाधव हॅट्रीकसाठी सज्ज

Published On: Mar 25 2018 6:17PM | Last Updated: Mar 25 2018 6:17PMपुणे : प्रतिनिधी

अकराव्या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव अजिंक्यपद भारत श्री स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्राचा अव्वल शरीरसौष्ठवपटू सुनीत जाधव हॅट्रीकसाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेत सर्वात बलाढ्य संघ हा महाराष्ट्राचाच असून सुनीतला महाराष्ट्राच्याच महेंद्र पगडेचे कडवे आव्हान राहणार आहे. 

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीतील बॉक्सिंग हॉल येथे ही स्पर्धा रंगणार असून दिग्गज आणि आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू पुण्यात दाखल झाले आहेत. या स्पर्धेसाठी विक्रमी संख्येने खेळाडू पुण्यात दाखल झाले असून स्पर्धेत सर्वात बलाढ्य संघ महाराष्ट्राचाच आहे. हॅट्रीकसाठी सज्ज असलेल्या सुनीत जाधवला आपले जेतेपद राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. त्याला फक्त महाराष्ट्राबाहेरील खेळाडूंकडूनच आव्हान आहे, असे नाही तर महाराष्ट्राच्या महेंद्र पगडेकडूनही त्याला काँटे की टक्कर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्राच्या संघात सागर कातुर्डे, नितीन म्हात्रे, महेंद्र चव्हाण, अक्षय मोगरकर आणि अतुल आंब्रे हे संभाव्य पदक विजेतेही खेळाडू आहेत. महाराष्ट्राची खरी लढाई रेल्वेच्या खेळाडूंशी रंगणार आहे. आंतररेल्वे स्पर्धेचा विजेता जावेद खान, राम निवास, किरण पाटील आणि सागर जाधव हे तयारीतले खेळाडू महाराष्ट्राला कडवे आव्हान देणार हे निश्‍चित आहे. तसेच केरळचा रियाझ टी.के., रशीद,दिल्लीचा मित्तल सिंग, नरेंदर, सीआरपीएफचा हरीराम आणि प्रीतम, पंजाब पोलीसांचा हिरालाल, सेनादलाचे अनुज, महेश्वरन आणि दयानंद सिंग यांच्या सहभागामुळे यंदाची भारत श्री आणखी चुरशीची झाली आहे.

एक लाख अंडी आणि 6 हजार किलो चिकन

भारत श्री सर्वार्थाने ऐतिहासिक ठरणार यात वाद नाही. 600 पेक्षा अधिक खेळाडू या स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. शरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सर्व खेळाडू आणि पदाधिकारी अशा तब्बल एक हजार जणांची निवास आणि भोजनाची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. त्याचबरोबर खेळाडूंना यादरम्यान त्यांच्यासाठी सकस आहार पुरवणे हेसुद्धा एक मोठे आव्हान असते. त्याच्या आहारात मीठ, मसाला आणि तेल काहीही नसते. खेळाडूंच्या आहारासाठी 1 लाख अंडी आणि 6 हजार किलो सोललेले चिकन मागविण्यात आले आहे. हा फक्त खेळाडूंच्या तीन दिवसांचा सकस आहार असून फळांचीही सोय करण्यात आल्याचे इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनी सांगितले.

Tags : pune bodybuilder suneet jadhav ready for hat trick,bharat shree compitition,