Sat, Aug 17, 2019 16:27होमपेज › Pune › भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर

भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर

Published On: Dec 02 2017 2:08AM | Last Updated: Dec 02 2017 1:40AM

बुकमार्क करा

पुणे ः प्रतिनिधी

सत्ताधारी भाजपमधील नगरसेवकांच्या एका गटाने समान पाणीपुरवठा योजनेला विरोध दर्शविल्यानंतर आता सायकल योजनेलाही विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकीकडे या योजना मंजूर करण्यासाठी सत्ताधारी भाजपचे काही नेते आणि पदाधिकारी आग्रही असतानाच एका गटाने त्या विरोधात भूमिका घेतल्याने भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

महापालिकेकडून शहरासाठी समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. ही योजना मार्गी लावण्यासाठी सत्ताधारी भाजपने आग्रही भूमिका घेतली आहे. सद्यःस्थितीला या योजनेतील विविध कामांसाठी प्रशासनाने निविदा प्रकिया राबविली आहेत; मात्र त्यावर भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्यासह त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे पदाधिकार्‍यांची कोंडी झाली आहे. ही कोंडी सुटण्याआधीच आता काकडेसमर्थक नगरसेवकांनी महापालिकेच्या सायकल योजनेला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.

ही योजना म्हणजे केवळ पुणेकरांच्या पैशाची उधळपट्टी होणार असून, यापूर्वी बांधण्यात आलेल्या सायकल ट्रॅकसाठी कोट्यवधींचा खर्च झाला, मात्र त्यातून शहराला काहीच फायदा होऊ शकलेला नाही. त्यामुळे या योजनेला आम्ही सभागृहात विरोध करणार असल्याचे काही नगरसेवकांनी सांगितले.