Wed, Apr 24, 2019 01:43होमपेज › Pune › भिडे आणि टिळक पुलांवर पडणार हातोडा

भिडे आणि टिळक पुलांवर पडणार हातोडा

Published On: Feb 14 2018 2:55AM | Last Updated: Feb 14 2018 2:04AM
पुणे :  पांडुरंग सांडभोर

शहरातून वाहणार्‍या मुठा नदीवरील बाबा भिडे पूल आणि जयंतराव टिळक पुलावर लवकरच महापालिकेचा हातोडा पडणार आहे. नदी सुधार योजनेअंतर्गत प्रवाहात पाण्याला अडथळा ठरणारी सर्व बांधकामे काढण्यात येणार आहेत. त्यानुसार भिडे आणि टिळक पूल पाडून, त्यांच्या जागी उंची असलेले पूल नव्याने बांधण्यात येणार आहेत. शहराच्या मध्य भागातून वाहणार्‍या मुळा-मुठा नद्यांच्या सुधारणांचा कार्यक्रम महापालिकेने हाती घेतला आहे.

त्याअंतर्गत दोन वेगवेगळे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. नद्यांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी जपानच्या जायका कंपनीच्या माध्यमातून एक तर गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर नदीकाठ संवर्धन हा दुसरा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत वहन क्षमता वाढवून नद्यांच्या काठाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने नदीमध्ये असलेली अतिक्रमणे, अस्तित्वातील जलवाहिन्या, सांडपाणी वाहिन्या तसेच महापालिकेकडून उभारण्यात आलेली बांधकामे काढण्यात येणार आहेत.