Fri, Feb 22, 2019 09:29होमपेज › Pune › लाभार्थी रूग्णांच्या उत्पन्न मर्यादेत विधी व न्याय कडून वाढ

लाभार्थी रूग्णांच्या उत्पन्न मर्यादेत विधी व न्याय कडून वाढ

Published On: Feb 28 2018 5:15PM | Last Updated: Feb 28 2018 5:14PMपुणे : प्रतिनिधी

राज्यातील धर्मादाय रूग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी निर्धन आणि आर्थिक दुर्बल घटकांची उत्पन्न मर्यादेत विधी व न्याय विभागाने वाढ केली आहे. यामुळे सर्वसामान्यांना उपचार घेणे सोयीस्‍कर ठरणार आहे.

पूर्वी धर्मादाय रूग्णालयात मोफत उपचार घेण्यासाठी रुग्णाचे वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ही 50 हजार होती ती आता 85 हजार झाली आहे. तर बिलाच्या रकमेत 50 टक्के सवलत मिळण्यासाठी पूर्वी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ही एक लाख रूपये होती तर ती आता एक लाख 60 हजार इतकी झाली आहे. 

विधी व न्याय विभागाने हे आदेश 23 तारखेला जारी केले असून त्याचा लाभ राज्यातील सर्व गरीब रुग्णांना होणार आहे. सध्याच्या काळात ही उत्पन्न मर्यादा अतिशय कमी असल्याने रूग्णालये आणि रूग्णांना त्याचा त्रास होत होता. त्यामुळे आता सर्वसामान्य रूग्णांना त्याचा फायदा होणार आहे. यासाठी राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी पाठपुरावा केला होता. 

आजपासून अंमलबजावणी

विधी व न्याय विभागाने निर्धन आणि आर्थिक दुर्बल या घटकांसाठी वाढवलेल्या उत्पन्न मर्यादेची अंमलबजावणी आजपासून करण्यात येत आहे. सध्या उपचारासाठी दाखल असलेल्या सर्व रूग्णांना याचा लाभ मिळणार आहे. हा आदेश सर्व धर्मादाय रूग्णालयांना कळविण्यात आला आहे, अशी माहिती पुण्याचे धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप यांनी दिली.