होमपेज › Pune › ऑडिट रिपोर्ट न देणार्‍या संस्था रडारवर

ऑडिट रिपोर्ट न देणार्‍या संस्था रडारवर

Published On: Jan 05 2018 1:23AM | Last Updated: Jan 05 2018 12:21AM

बुकमार्क करा
पुणे :  ज्ञानेश्‍वर भोंडे

शहरातील धर्मादाय आयुक्तालयाकडे नोंद झालेल्या अनेक शैक्षणिक संस्था या आयुक्तालयाकडे वार्षिक  अहवाल पाठवत नसल्याचे उघडकीस आले आहे; त्यामुळे अशा संस्थांविरोधात धर्मादाय कार्यालयाने कडक पावले उचलली असून, ज्या संस्था अहवाल पाठवत नाहीत अशा संस्थांची यादी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मागवली आहे. तसेच अहवाल सादर न करणार्‍या  संस्थांची नोंदणी रद्द करण्याचा इशारा दिला आहे. 

धर्मादाय आयुक्तालयाला गेल्या पाच वर्षांपासून लेखापरीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) तसेच बदल अर्ज (चेंज रिपोर्ट) सादर न करणार्‍या निष्क्रिय संस्थांची नोंद रद्द करण्याची मोहीम आयुक्तालयाने सुरू केली आहे. याअंतर्गत आतापर्यंत राज्यात 70 हजारांपेक्षा अधिक संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. काही संस्था जाणीवपूर्वक धर्मादाय आयुक्तालयाऐवजी केवळ आयकर विभागाकडे अहवाल सादर करतात. अशा संस्थांची नोंद धर्मादायने मुंबईमध्ये रद्द केली आहे. या प्रकाराची पुणे शहरात पुनरावृत्ती घडू नये म्हण्ाून धर्मादायने पावले उचलली आहेत. 

धर्मादायकडे नोंद असलेल्या संस्थांनी दरवर्षी लेखापरीक्षण अहवाल तसेच चेंज रिपोर्ट धर्मादाय कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे; परंतु गेल्या पाच वर्षांपासून अनेक संस्था हा अहवालच सादर करत नसल्याचे उघडकीस आले आहे. धर्मादाय आयुक्तालयाच्या अखत्यारीत असलेल्या अनेक शैक्षणिक संस्थांना शासनाच्या सवलती, सोयीसुविधा मिळतात. त्याचा लेखापरीक्षण अहवाल धर्मादायला दरवर्षी सादर करणे बंधनकारक आहे; परंतु हा अहवाल देण्यास संस्थाचालक टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.  त्यामुळे धर्मादाय उपायुक्त एस. एम. गोडसे यांनी पत्राद्वारे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पुणे जिल्ह्यातील जवळपास 908 स्वयंसेवी संस्थांच्या शाळांची माहिती मागितली आहे. यासंदर्भात शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी अशा संस्थांची माहिती लवकरात लवकर पाठवणार असल्याची माहिती दिली. तर, शिक्षण विभागाने संस्थांच्या नावांची यादी दिल्यानंतर ज्या संस्थांनी गेल्या पाच वर्षांपासून लेखापरीक्षण अहवाल सादर केला नाही, अशा संस्थांची नोंदणी रद्द करण्याचा इशारा धर्मादाय आयुक्तालयाने दिला आहे.