होमपेज › Pune › मॅरेथॉन झाल्यास कारवाईचा बडगा

मॅरेथॉन झाल्यास कारवाईचा बडगा

Published On: Dec 03 2017 1:44AM | Last Updated: Dec 03 2017 12:18AM

बुकमार्क करा

पुणे :प्रतिनिधी

32 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा, उद्या  रविवारी (दि. 3) होणार असून, या स्पर्धेला भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघटनेची कोणतीही मान्यता नाही. त्यामुळे ही स्पर्धा पार पडल्यास महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेवर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच, भारतीय धावपटूंनीही या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ नये, अन्यथा त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा इशारा भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे सरचिटणीस वॉलसन यांनी दिला आहे. दरम्यान, मॅरेथॉनची परंपरा असलेल्या पुण्याला या वर्षी गालबोट लागले असून, धावपटूंची यामध्ये कुचंबणा होत असल्याचे समोर आले आहे. पुणे मॅरेथॉन ट्रस्ट आणि पुणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने 32 वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन 

स्पर्धेला रविवारी सणस मैदानावर प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेच्या मान्यतेवरून सध्या वाद सुरू झालेला आहे. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने या स्पर्धेला मान्यता दिलेली नाही; तर दुसर्‍या बाजूला आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनने या स्पर्धेला मान्यता दिलेली असल्याने इतर संघटनांच्या मान्यतेची आवश्यकता नसल्याचे मत संयोजकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे भारतीय धावपटूंमध्ये मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. 

याबाबत पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, की पुणे मॅरेथॉन ही स्पर्धा होणार आहे. मॅरेथॉन ही मॅरेथॉनप्रमाणे पार पडेल. परंतु, त्यातील महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा निधी आणि इतर बाबी या महापालिकेच्या धोरणानुसार दिला जाईल. पुणे मॅरेथॉन स्पर्धा संयोजन समितीचे सदस्य आणि महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड म्हणाले की, महापालिकेकडून स्पर्धेला देण्यात येणारा 35 लाख रुपयांचा निधी अद्यापपर्यंत आम्हाला मिळालेला नाही. या निधीची आम्ही वाट पाहात आहोत. परंतु स्पर्धेनंतर खेळाडूंना निधी देणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिकेकडून तोपर्यंत निधी न आल्यास आयोजक म्हणून आम्ही निधी गोळा करून तो खेळाडूला देण्याची जबाबदारी पार पाडू. 

याबाबत भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे सरचिटणीस वॉलसन म्हणाले की, आम्ही पुणे मँरेथॉनला मान्यता दिलेली नाही. महाराष्ट्र संघटनेने स्पर्धेचा निधी दिलेला नाही, जर या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय संघटनेने मान्यता दिली असल्यास तसेच, भारतीय खेळाडू स्पर्धेत सहभागी झाल्यास त्यांच्यावरदेखील कारवाईचे संकेत त्यांनी या वेळी दिले. तसेच स्पर्धा झाल्यास महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेवर कारवाई करण्यात येईल. या स्पर्धेच्या दोन दिवस आधी स्पर्धेचे संचालक प्रल्हाद सावंत आम्हाला भेटले आणि त्यांनी निवेदन दिले. त्यामुळे आम्हाला सर्वेक्षणासाठी पुरेसा अवधी मिळाला नाही. दिल्ली, मुंबई आणि इतर ठिकाणी होणार्‍या स्पर्धेला व पुणे मॅरेथॉन स्पर्धेला सारखेच नियम आहेत.