Tue, Jun 18, 2019 22:21होमपेज › Pune › सहायक अभियंता जाळ्यात 

सहायक अभियंता जाळ्यात 

Published On: Dec 20 2017 2:38AM | Last Updated: Dec 20 2017 2:06AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

नवीन बांधण्यात आलेल्या इमारतीमधील 13 फ्लॅटमध्ये नवीन वीज मीटर देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या हवेली तालुक्यातील आंबेगाव शाखेतील सहायक अभियंत्यास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले. मंगळवारी दुपारी ही कारवाई शाखेच्या आवारातच करण्यात आली. 

प्रमोद वसंतराव चिंदे (वय 38, रा. ज्योती हॉटेलमागे, कोंढवा) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या सहायक अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 35 वर्षीय तक्रारदाराने तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी आंबेगाव परिसरात नवीन 13 फ्लॅट बांधले आहेत. त्यांना याठिकाणी वीज मीटर घ्यायचे होते. त्यांसाठी त्यांनी हवेली तालुक्यातील महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या आंबेगाव शाखेत वीज मीटर मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्या वेळी अभियंता प्रमोद चिंदे यांनी वीज मीटर देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारादार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार, मंगळवारी दुपारी आंबेगाव शाखेतच चिंदे याला तक्रारदार यांच्याकडून 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 1064 या टोल फ्री क्रमांकावर, तसेच 020- 26122134, 26132802, 26050423 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे.