Wed, Sep 19, 2018 14:52



होमपेज › Pune › लष्कराकडून विद्यापीठाला रणगाडा भेट

लष्कराकडून विद्यापीठाला रणगाडा भेट

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





पुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र (डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज्) विभागाला लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडून टी-55 प्रकारचा रणगाडा भेट म्हणून दिला जाणार आहे. हा रणगाडा बुधवारी पहाटेपर्यंत दाखल होणार असून, तो या विभागासमोर ठेवण्यात येणार आहे. त्याचे अनावरण दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल पी. एम. हॅरिस यांच्या हस्ते बुधवारी (29 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजता केले जाणार आहे.

संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाचे भारतीय लष्कराशी दीर्घ काळापासून संबंध  आहेत. परस्परांमध्ये काही करार झाले आहेत आणि अभ्यासाची देवाण-घेवाण होते. त्यामुळेच लष्कराने ही भेट दिली आहे, अशी माहिती या विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे यांनी दिली. या कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम आदी उपस्थित राहणार आहेत.

लष्कराने या विभागाशी केलेल्या करारात छत्रपती शिवाजी पॉलिसी चेअर स्थापन केली आहे. त्याअंतर्गत लष्करातील ब्रिगेडियर किंवा त्यापुढच्या पदावरील व्यक्तीची संशोधन आणि अध्यापनासाठी दोन वर्षांसाठी निवड केली जाते. आतापर्यंत लेफ्टनंट जनरल अशोक जोशी, लेफ्टनंट जनरल एच. एम. खन्ना, लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर, मेजर जनरल राव, मेजर जनरल संजय भिडे हे या अध्यासनावर होते. सध्या लेफ्टनंट जनरल ए. एल. चव्हाण कार्यरत आहेत

. याशिवाय भारतीय लष्कर आणि विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाकडून दर वर्षी ’जनरल बी. सी. जोशी व्याख्यान’ आयोजित केले जाते. त्यासाठी पायदळ, नौदल आणि वायूदलाचे प्रमुख आळीपाळीने येतात. याशिवाय अनेक कर्नल व त्यांच्यापेक्षा वरच्या पदावरील अधिकारी या विभागातून एम.फिल. व ’स्कॉलर इन रेसिडन्सी’ असे अभ्यासक्रम पूर्ण करतात. आतापर्यंत अशा 70 अधिकार्‍यांनी हे शिक्षण पूर्ण केले आहे.