Tue, May 21, 2019 04:37होमपेज › Pune › तांत्रिक गोंधळात अभियोग्यता चाचणी सुरू

तांत्रिक गोंधळात अभियोग्यता चाचणी सुरू

Published On: Dec 13 2017 2:38AM | Last Updated: Dec 13 2017 1:56AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरती करण्यासाठी घेण्यात येणारी अभियोग्यता आणि बुध्दीमापन चाचणीला मंगळवार दि. 12 रोजी सुरुवात झाली. परंतु काही केंद्रावर विद्यार्थ्यांना तांत्रिक गोंधळाला सामोरे जावे लागले असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तर, राज्य परीक्षा परीषदेतील अधिकार्‍यांनी परीक्षा व्यवस्थित पार पडल्याचा दावा केला आहे. वेळापत्रकाप्रमाणे पहिल्या दिवशी 13 हजार 274 विद्यार्थ्यांपैकी 11 हजार 744 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून पहिल्या सत्रात 87 टक्के तर दुसर्‍या सत्रात 90 टक्के विद्यार्थी हजर असल्याची माहिती राज्य परीक्षा परीषदेने दिली आहे.

2012 मध्ये बंद झालेल्या शिक्षक भरतीनंतरही अनेक शाळांनी वैयक्तिक मान्यतांच्या आणि ना-हरकत प्रमाणपत्रांच्या आधारे शिक्षक भरती केली. या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता देखील झाली. त्यामुळेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित अंशत: अनुदानित आणि अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी आणि शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड व्हावी, यासाठी शिक्षण सेवकांची भरती अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या आधारे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

राज्यातील 67 केंद्रावर अभियोग्यता आणि बुध्दीमापन चाचणीस मंगळवारी सुरुवात झाली खरी, परंतु काही केंद्रावर मात्र विद्यार्थ्यांना तांत्रिक गोंधळ झाल्याचा विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही ठिकाणी सर्व्हर ‘हँग’ झाल्यामुळे परीक्षेला उशीर झाला. तर, काही ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा संपल्यानंतर आपला नेमका स्कोअर किती झाला हेच समजले नाही. प्रश्‍नपत्रिकेमध्ये आलेल्या आकृत्या समजल्याच नसल्याचे देखील काही विद्यार्थ्यांनी सांगितले. तर, काही विद्यार्थ्यांनी शिक्षणशास्त्र, अंकगणित, बुद्धिमत्ता यासंदर्भात सर्वात जास्त प्रश्‍न असल्याचे सांगत मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, शिक्षणशास्त्र यासंदर्भात सर्वाधिक प्रश्‍न विचारण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन केले तर पर्याप्त वेळेत 200 प्रश्‍न सोडविता येत असल्याचा विश्‍वास देखील विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.