Sun, Jul 21, 2019 07:47होमपेज › Pune › ‘वेळप्रसंगी मराठीसाठी सरकारविरोधी भूमिका घेईन’

वेळप्रसंगी मराठीसाठी सरकारविरोधी भूमिका घेईन’

Published On: Dec 11 2017 1:33AM | Last Updated: Dec 11 2017 1:33AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

प्रशासकीय सेवेत असताना मी मला पाहिजे तेच केले. यामुळे माझी पाच वेळा बदली झाली. मराठीची सेवा हे साहित्यिक म्हणून माझे कर्तव्य आहे, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी मी आग्रही आहे. मराठी भाषेसाठी मी प्रसंगी सरकारविरोधी भूमिका घ्यायलाही  तयार आहे, अशी भूमिका नवनिर्वाचित साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी मांडली. बडोदा येथे होणार्‍या 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे पेढा भरवून अभिनंदन केले. अंजली देशमुख, निखिल देशमुख, रामचंद्र भोंडवे, भारती भोंडवे, मंदाकिनी टिळकीकर उपस्थित होते. 

निवडीनंतर देशमुख यांनी समाधान व्यक्त केले असून, स्वतःची भूमिका स्पष्ट केली.  ते म्हणाले की, सध्या अभिव्यक्तीचा प्रश्‍न  गंभीर बनत चालला आहे. विवेकी माणसांचा आवाज दाबला जात आहे ही  गंभीर बाब आहे. अभिव्यक्तीची गळचेपी होत असेल तर, लेखकाने आवाज उठविला पाहिजे. त्यांनी बोलताना मराठी भाषेच्या धोरणाबाबतही विचार व्यक्त केले. सध्या मराठी भाषेची अत्यंत गंभीर अवस्था आहे. नवीन पिढीला मराठी नीट बोलता येत नाही  आणि शाळांमध्ये मराठी विषय चांगल्या प्रकारे शिकवला जात नाही. मराठी भाषा आणि संस्कृतीचा खर्‍या अर्थाने प्रचार-प्रसार आणि संवर्धन करण्यासाठी सर्व माध्यमांमध्ये बारावीपयर्र्ंत मराठी विषय अनिवार्य केला पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. प्रत्येक तालुक्यामध्ये मराठी पुस्तक विक्री केंद्र उभारावे, इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळांमध्येही बारावीपयर्र्ंत  मराठी भाषा विषय अनिवार्य करावी, यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.

शेजारील राज्यांत मराठीसाठी पोषक वातावरण नाही. मराठी भाषेची गळचेपी केवळ कर्नाटकमध्येच नाही तर गुजरात, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, गोवा अशा शेजारी राज्यांमध्येही  सुरू आहे. या राज्यांमध्ये मराठीसाठी पोषक वातावरण नाही, यासाठी ठोस भूमिका महाराष्ट्राने घेणे गरजेचे आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या शेजारील राज्यामध्ये मराठीचा प्रचार-प्रसार आणि संवर्धन योग्य प्रकारे व्हावे यासाठी बृहनमहाराष्ट्र मराठी विभाग स्थापन करून त्यावर प्रशासकीय अधिकारी नेमावा. या विभागाची दर तीन महिन्यांनी बैठक घेऊन मराठी भाषा आणि संस्कृती संदर्भातील समस्या यासंदर्भात अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

वाचा : साहित्य संमेलनाध्यक्षपदी कादंबरीकार लक्ष्मीकांत देशमुख (व्हिडिओ)