Wed, Aug 21, 2019 14:47होमपेज › Pune › अनिल अवचट यांना जीवन गौरव पुरस्कार

अनिल अवचट यांना जीवन गौरव पुरस्कार

Published On: Jan 14 2018 1:53AM | Last Updated: Jan 14 2018 1:31AM

बुकमार्क करा
पुणे :प्रतिनिधी

महाराष्ट्र फांउडेशन अमेरिका संस्थेतर्फे दिला जाणार्‍या साहित्य जीवन गौरव पुरस्काराने अनिल अवचट यांना सन्मानित करण्यात आले. तर गंगाप्रसाद अग्रवाल यांना समाजकार्य जीवन गौरव, अरविंद गूूपता यांना डॉ नरेंद्र दाभोलकर स्मृती, सई परांजपे यांना अपारंपरिक ग्रंथ, कल्पना दुधाळ यांना ललित ग्रंथ , अजित दळवी यांना रा.शं.दातार, तर चेतना गाला-सिन्हा, रुबिना पटेल आणि अरुण जाधव यांना कार्यकर्ता पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी सिद्धार्थ वरदराजन यांची प्रमुख उपस्थिती होती. 

वरदराजन म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ज्या विषयांवर बोलले, जे प्रश्न त्यांनी उपस्थित केले, ज्या पद्धतीने केले ते प्रशंसनीय आहे.काहींचे म्हणणे असले की हे प्रशासकीय कामाच्या तक्रारी आहे. त्यांचे कौतुक करण्यापेक्षा त्यांचे म्हणणे समजून घेण्याची अत्यंत गरज आहे. आपण ऐकायला हवे असेही ते म्हणाले. या मनोगतात त्यांनी माध्यमांवरही टीकेची झोड उठवली. सध्या माध्यमांचा एक हिस्सा आजही लोकांना विचलीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्य मुद्द्यांवर चर्चा होणे गरजेचे असताना त्याचे  वाहिन्यांवर मात्र तसे होताना दिसत नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या झाली मात्र त्यावर चर्चा होत नाही असेही ते म्हणाले. 

अवचट यांनी पुरस्काराला उत्तर देताना आपल्या लेखक असण्यावर भाष्य केले. एखादा खड्डा खोदत असताना अचानक रस्ता तयार झाल्याचे लक्षात येते अशीच भावना लेखनाविषयीची असल्याची त्यांनी व्यक्त केली. माणसांच्या दुःखाने मला शिकवलं असेही ते म्हणाले. अनेक दृश्य बघत मी घडलो आणि जे बघितलं तेच लिखाणात  सांगितलं व लेखक झालो असेही त्यांनी म्हटले.समोर पाहत होतो तेच माझे निष्कर्ष झाले असा अनुभव त्यांनी सांगितला.हा सर्व प्रवास पत्नी सुनंदा यांच्यामुळे झाल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. हेमंत नाईकनवरे यांनी प्रास्ताविक केले.विनोद शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ हमीद दाभोलकर यांनी आभार मानले.