Tue, Apr 23, 2019 22:29होमपेज › Pune › महाराष्ट्र, कर्नाटकात घेतले अंदुरेने पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण

महाराष्ट्र, कर्नाटकात घेतले अंदुरेने पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण

Published On: Aug 20 2018 1:40AM | Last Updated: Aug 20 2018 1:28AMपुणे : प्रतिनिधी

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणार्‍यांपैकी सचिन प्रकाशराव अंदुरे हा एक असल्याचा व गुन्ह्यातील मुख्य आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याबरोबर अंदुरे हा प्रत्यक्ष कटात सामील असल्याचा दावा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) न्यायालयात  रविवारी केला. त्याला पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे देण्यात आले होते. ते  प्रशिक्षण नेमके कोठे देण्यात आले, याचा तपास करण्यासाठी त्याला कोठडी देण्याची मागणी सीबीआयने केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजुमदार यांनी युक्तिवादानंतर अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला सोमवारी (20 ऑगस्ट) पाच वर्षे पूर्ण होत आहेत. नालासोपारा स्फोटके प्रकरणात संशयित वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयच्या पथकाने डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित हल्लेखोर अंदुरेला शनिवारी अटक केली.

अणदुरेला सीबीआयच्या पथकाने रविवारी शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयात कडेकोट पोलिस बंदोबस्तात दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी हजर केले. यावेळी बचाव पक्षाच्या वकिलांनी वकीलपत्र घेण्यासाठी तसेच अणदुरेबरोबर बोलण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. न्यायालयाने बचाव पक्षाच्या वकिलांना त्याला भेटण्याची परवानगी दिली. त्यानंतर सीबीआयचे विशेष सरकारी वकील विजयकुमार ढाकणे यांनी न्यायालयापुढे बाजू मांडली. 

पुण्यात 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी बालगंधर्व रंगमंदिराशेजारच्या ओेंकारेश्‍वर मंदिराजवळील पुलावर डॉ. दाभोलकर हे ‘मॉर्निंग वॉक’साठी आले असताना, त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. 

या प्रकरणात कटातील मुख्य सूत्रधार तावडेला अटक करून त्याच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे. दाभोलकरांवर गोळी झाडणार्‍यांपैकी अंदुरे एक असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्याला पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण त्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात घेतले आहे. त्याला पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण कोणी व कोठे दिले? कट रचण्यासाठी त्याला पायाभूत सुविधा कोणी पुरविल्या? या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे? याचा तपास करायचा आहे, त्यामुळे अंदुरेला 14 दिवसांच्या पोलिस कोठडची मागणी अ‍ॅड. ढाकणे यांनी केली.

अणुदरेला या प्रकरणात गोवले : अ‍ॅड. सालसिंगीकर दरम्यान, सरकारी पक्षाच्या युक्तिवादाला बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. प्रकाश सालसिंगीकर यांनी विरोध केला. ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात डॉ. तावडे याला अटक करण्यात आली होती. सीबीआयकडून या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रात सारंग अकोलकर, विनय पवार यांनी डॉ. दाभोळकर यांची हत्या केल्याची थिअरी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीला तर खंडेलवाल आणि नागोरी यांनाही कोणतेही पुरावे नसताना अटक करण्यात आली. तेथेही तपास यंत्रणेची थिअरी फसली. डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणात सीबीआयला आरोपीचा माग काढता आला नाही. या प्रकरणात राजकीय आणि सामाजिक दबावापोटी अंदुरेला अटक करण्यात आली आहे. तावडेेवरील दोषारोपपत्रात अंदुरेचा उल्लेखदेखील नसताना त्याला अटक करून या प्रकरणात गोवण्यात आले आहे. 14 ऑगस्ट रोजी राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अंदुरेला चौकशीसाठी बोलावले होते. नंतर अणदुरेला सोडून देण्यात आले होते. त्यानंतर सीबीआयच्या पथकाने त्याला चौकशीसाठी बोलावले. त्याच्या नऊ ठिकाणी कागदपत्रांवर सीबीआयने सह्या घेतल्या आहेत. ती कागदपत्रे त्याला वाचण्यासाठी न देताच कागदपत्रांवर सह्या घेतल्या आणि त्याच्या कुटुंबीयांना कोणतीही कल्पना न देता अटक केली’, असा युक्तिवाद अ‍ॅड. सालसिंगीकर यांनी केला.

पुढील तारखेला या प्रकरणात तावडेंवर दाखल झालेले आरोपपत्र सादर करण्यास सीबीआयला सांगावे, अशी विनंतीही न्यायालयाकडे विनंती करत, अ‍ॅड. सालसिंगीकर यांनी, ‘केवळ एकच दिवस पोलिस कोठडी द्यावी’, अशी मागणी केली. त्यानंतर अ‍ॅड. ढाकणे यांनी बचाव पक्षाने केलेल्या युक्तिवादावर स्पष्टीकरण देताना न्यायालयाला सांगितले की, सीबीआयची कोठेही थिअरी फसली नाही. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमध्ये साक्षीदारांच्या सांगण्यानुसार आर्टिस्टने रेखाचित्रे रेखाटली होती. ती रेखाचित्रे सारंग अकोलकर आणि विनय पवार यांच्याशी मिळतीजुळती होती. परंतु, आरोपपत्रात सारंग अकोलकर आणि विनय पवार हे आरोपी आहेत आणि त्यांनीच गोळ्या झाडल्या आहेत, असे कोठेही नमूद केलेले नसल्याचे अ‍ॅड. ढाकणे म्हणाले.

माझा भाऊ निष्पाप

माझा भाऊ निष्पाप आहे. त्याला या प्रकरणात विनाकारण गोवण्यात येऊन, बळीचा बकरा बनविले आहे. तो या गुन्ह्यातून निर्दोष सुटेल, याची मला आशा आहे. त्याला अटक केल्याबाबत काल समजले. 2006 मध्ये आई-वडिलांचे निधन झाले, तेव्हापासून आम्ही वेगळे राहतो. तो अशा पद्धतीचे कृत्य करण्याची कोणतीही शक्यता नसून, त्याचे यापूर्वी कोणतेही गुन्हेगारी रेकार्ड नाही, असे सचिन अंदुरेचा मोठा भाऊ प्रवीण अंदुरे याने पत्रकारांशी बोलताना सांगितले.