Sun, Jul 21, 2019 06:00होमपेज › Pune › रखडलेले प्रकल्प अखेर मार्गावर

रखडलेले प्रकल्प अखेर मार्गावर

Published On: Mar 05 2018 1:57AM | Last Updated: Mar 05 2018 1:14AMपुणे : दिगंबर दराडे

शहराच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या प्रकल्पांना आता गती मिळाली आहे. मेट्रोचे काम सुरू झाले असून, पुढील महिन्यापासून रिंग रोडचे काम सुरू होणार आहे. पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्व परवानग्या मिळाल्या असून, कोणत्याही क्षणी भूसंपादन सुरू होणार आहे.  पंधरा वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पांनी आता गती घेतली आहे. मेट्रोचे काम सुरू असून, त्यापाठोपाठ रिंग रोडचेदेखील काम सुरू होणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सर्व परवानग्या प्राप्‍त झाल्या आहेत.  पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांतील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी प्रादेशिक योजनेत (आरपी) रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला होता.

पीएमआरडीएने हा प्रस्तावित रिंग रोड विकसित करण्याचा निर्णय घेतला. पीएमआरडीएकडून प्रस्तावित करण्यात आलेला रिंग रोड हा मुंबई महामार्ग-नाशिक रस्ता-नगर रस्ता- सोलापूर रस्ता आणि सातारा रस्ता या चार महामार्गांना जोडणारा आणि 128 किलोमीटर लांबीचा असणार आहे. हा रस्ता 110 फूट रुंद आणि 16 पदरी असून, यापैकी आठ पदरी रस्ता महामार्ग म्हणून, तर त्याच्या दोन्ही बाजूंस प्रत्येकी चार पदरी रस्ता हा स्थानिक वाहतुकीसाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. हा रस्ता सिग्नल फ्री असणार आहे. 

पुरंदर येथे प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भातील तांत्रिक अहवाल एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीने तयार केला असून, तो संरक्षण विभागाकडे सादर करण्यात आला. त्यांनीही परवानगी दिली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी राज्य सरकारने पुरंदर येथील जागा निश्‍चित केली आहे. विमानतळासाठी निश्‍चित केलेल्या जागेचा सर्वंकष प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनकडून (एमआयडीसी) देण्यात आले आहे.