Mon, May 20, 2019 10:17होमपेज › Pune › बाजार समितीची दुरवस्था

बाजार समितीची दुरवस्था

Published On: Feb 12 2018 2:04AM | Last Updated: Feb 12 2018 12:43AMपुणे  : देवेंद्र जैन

राज्याच्या व पुणे शहराच्या तिजोरीमध्ये हजारो कोटींचा महसूल देणार्‍या मार्केट यार्ड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराची दुरवस्था पाहून सामान्य माणसाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. कारण येथील फळ बाजार, फूल बाजार, भाजीपाला विभागात योग्य नियोजनाच्या अभावामुळे शेतकर्‍यांना सुविधांपासून वंचित राहावे लागते. आणीबाणीप्रसंगी शेतकर्‍याला कुठल्याही प्रथमोपचाराची सुविधा उपलब्ध नाही. अनेक ठिकाणी मलनिःस्सारण वाहिन्या फुटल्यामुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न उद्भवत आहेत. येथील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न तर नागरिक, शेतकर्‍यांसह प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. दिवसेंदिवस येथील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍नही गंभीर बनत आहे.

या  सर्व प्रश्‍नांकडे बाजार समिती प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी आणि सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.  जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांची अर्थव्यवस्था शेतीमाल व किराणा भुसार मालाच्या आवक व जावकेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी उत्पादित माल येथील बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणतात व येेथील नोंदणीकृत दलाल व व्यापारी मालाची विक्री करतात. पुणे मार्केट यार्ड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही 190 एकरमध्ये व्यापली आहे. या संपूर्ण आवाराची जबाबदारी ही बाजार समितीची असून, त्यासाठी कोट्यवधींचा महसूल वसूल केला जातो.

सदर महसुलातून येथे येणार्‍या शेतकर्‍यांना  आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा पुरवण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे. शेतकर्‍याला त्याच्या मालाला नुसता भावच नव्हे तर तो व त्याचा मदतनीस, त्याचा वाहनचालक, हमाल जोपर्यंत बाजार समितीच्या आवारात आहे, तोपर्यंत त्यांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा पुरवणे आवश्यक आहे. त्यामध्ये प्रामुख्याने स्वच्छतागृह, विश्रांती कक्ष, वजन काटे, माल झाकून ठेवण्याकरिता शेड अथवा आच्छादित विभाग, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, प्रथमोपचार सुविधा व नाशवंत मालासाठी शीतगृह आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शेतकर्‍याच्या मालाला सुरक्षा पुरवणे व त्याच्या विक्री केलेल्या मालाचे पैसे 24 तासात मिळवून देणे, तसेच शेतकर्‍याने त्याच्या मालाबाबत काही तक्रार केल्यास त्या तक्रारीचा कायदा सुव्यवस्था राखून त्वरित निपटारा करणे, ही बाजार समितीची कर्तव्ये आहेत. 

पुणे येथील मार्केट यार्डमधील परिस्थिती अतिशय भयानक असल्याचे दिसून येते. येथे शेतकर्‍यांसाठी  अनेक विभाग आहेत. फळ बाजार, फूल बाजार, भाजीपाला विभागात योग्य नियोजन नसल्यामुळे अनेक शेतकर्‍यांना बर्‍याच वेळा वाईट अनुभव येतात. आवश्यक असलेल्या सोयीसुविधा न मिळाल्यामुळे शेतकर्‍यांचा नाहक खर्च वाढतो व त्यांच्यावर प्रत्येक गोष्टीत अन्याय होतो. शेतकरी व त्याचा मदतनीस आणि वाहनचालक रात्रभर मालाचे रक्षण करत बसतात व दुसर्‍या दिवशी मिळेल त्या भावात माल विकून रवाना होतात. त्याकरिता आडत्यांनीपण शेतकर्‍यांची बाजू समजून घेणे आवश्यक आहे. आणीबाणीप्रसंगी कुठल्याही प्रथमोपचाराची सुविधा त्यांना उपलब्ध नाही. शेतकर्‍यांना निवासाची सुविधाही आवश्यक आहे. शेतमालाच्या तपासणीसाठी प्रयोग शाळा जरुरीची आहे. नाशवंत मालासाठी शीतगृहाची (कोल्ड स्टोरेज) आवश्यकता आहे.