Mon, Aug 19, 2019 00:58होमपेज › Pune › अभिनेत्याने केला अभिनेत्रीचा विनयभंग

अभिनेत्याने केला अभिनेत्रीचा विनयभंग

Published On: Sep 03 2018 1:44AM | Last Updated: Sep 03 2018 1:44AMपुणे : प्रतिनिधी

मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मुख्य भूमिकेत काम करणार्‍या अभिनेत्याने त्याच चित्रपटातील अभिनेत्रीशी लगट करण्याचा प्रयत्न करून विनयंभग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. सुभाष दत्तात्रय यादव (वय 27, रा. शास्त्रीरोड, मूळ दौंड) असे अटक करण्यात आलेल्या अभिनेत्याचे नाव आहे. याप्रकरणी 23 वर्षीय अभिनेत्रीने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

सुभाष यादव याचे एमबीएपर्यंत शिक्षण झालेले आहे, तर अभिनेत्री मुंबई येथील आहे. दोघांनी एका मराठी चित्रपटात अभिनेता व अभिनेत्रीच्या मुख्य भूमिकेत काम केले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण विविध शहरांत झाले आहे. त्यादरम्यान सुभाष याने फिर्यादींशी जवळीक करण्याच्या उद्देशाने सतत फोन केले. परंतु अभिनेत्रीने त्याला प्रतिसाद दिला नाही. तरीही सुभाषने संपर्क  न केल्यास फिर्यादींना बदनाम करण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादींना चतु:श्रृंगी परिसरात भेटण्यास बोलविले. फिर्यादी या त्याला समजावून सांगण्यास तेथे गेल्या. त्यावेळी फिर्यादींना पुन्हा धमक्या दिल्या. 

हे प्रकरण वाढू नये, यामुळे फिर्यादींनी तत्काळ पोलिसांच्या नियत्रंण कक्षाला फोन करून तक्रार केली. दोन कर्मचार्‍यांनी तत्काळ धाव घेऊन दोघांना पोलिस ठाण्यात नेले. या ठिकाणी सुभाष याने फिर्यादींची माफी मागितली. त्यामुळे फिर्यादींनी तक्रार दिली नाही. त्यानंतर काही महिने त्यांने फिर्यादींना त्रास किंवा संपर्कही केला नाही. मात्र, परत काही दिवसांनी फिर्यादींना टार्गेट केले. तसेच चित्रपटाच्या प्रीमिअर शोच्या वेळी चित्रपटगृहाजवळ नाचलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामुळे माझी बदनामी झाल्याचे सांगत, फिर्यादींचा मोबाईल क्रमांक माहिती असताना पोलिसांकडे तक्रार केली. 

पोलिसांनी तपास केल्यानंतर सुभाष याला हा क्रमांक माहीत असताना तो अज्ञात क्रमांक म्हणून पोलिसांकडे तक्रार देऊन दिशाभूल केल्याचे समोर आले. तसेच फिर्यादींशी जवळीक करण्याच्या उद्देशाने वेगवेगळे बहाणे करून त्यांचा पाठलाग, धमकावण्याचे प्रयत्न करून जवळीक साधण्याचा केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर याप्रकरणी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.