Wed, Jul 17, 2019 18:08होमपेज › Pune › इंदिरा शाळेच्या विद्यार्थ्यांचा सहलीदरम्यान अपघात

इंदिरा शाळेच्या विद्यार्थ्यांचा सहलीदरम्यान अपघात

Published On: Dec 16 2017 2:26AM | Last Updated: Dec 16 2017 2:26AM

बुकमार्क करा

पुणे ः प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना सैर घडवणारी ट्रॅक्टर ट्रॉली पलटल्याने वाकड येथील इंदिरा स्कूलचे 20 विद्यार्थी जखमी झाले आहेत. शुक्रवारी (दि. 15) दुपारी तीन वाजता कोंढवा सासवड रोडवर असलेल्या गरडे गावाजवळील ‘द हिडन ओयासिस’ येथील कृषी पर्यटन केंद्रात हा अपघात झाला. यापैकी दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर पूना आणि सह्याद्री रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. वीस विद्यार्थ्यांपैकी 19 विद्यार्थी पूना तर, एका विद्यार्थ्यास डेक्कन येथील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील 17 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून त्यांना सर्वसाधारण कक्षात तर दोन विद्यार्थ्यांना पूना हॉस्पिटलच्या बालरोग विभागाच्या अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

इंदिरा स्कूलचे जवळपास 420 विद्यार्थी शिक्षकांसह कृषि पर्यटनासाठी गेले होते. शुक्रवारी दुपारी तीनच्या दरम्यान ते ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीमधून पर्यटनाचा आनंद घेत होते. सर्व विद्यार्थ्यांनी रपेट केली आणि शेवटचे 35 ते 40 विद्यार्थी शिक्षकांसहित रपेट करत असताना ते ट्रॉलीच्या एकाच बाजूला आले. दरम्यान, धावत्या ट्रॉलीच्या चाकाखाली दगड आल्याने ट्रॉली उलटली आणि सर्व विद्यार्थी खाली पडले, अशी माहिती पूना हॉस्पिटल येथे जमलेल्या पालक आणि शिक्षकांनी दिली. यातील काही विद्यार्थ्यांच्या तोंंडाला, हाताला मार लागला. दरम्यान, शाळा प्रशासनाने त्यांना इतर रुग्णालयात दाखल न करता रुग्णवाहिकेद्वारे पूना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सर्व विद्यार्थ्यांना येथे दाखल करण्यात आले.  यातील काही विद्यार्थी तातडीच्या कक्षात, सर्वसाधारण कक्षात तर दोन विद्यार्थी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.  जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे   साहिल जैन, तनिषा मेहता, रिया अरोरा, शिवांश माळी, रुबेन मुखर्जी, ॠषि सिंह, तन्वी क्षिरसागर, नील सादेकर, अभिराम केदारनाथ, मदन अर्शिया, शिवेंश लाडगणे, निहीरा कारळे, विरेन अडवानी, अतुल्य सिंह, नादीर अयान, आयुष व्यास, उत्कर्षा अग्रवाल, राजोषी बासू अशी पुना हॉस्पिटल येथे दाखल असलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. यापैकी बासू राजोशी आणि नादीर अयाम या दोघांना अतिदक्षता विभागात दाखल केले आहे.