होमपेज › Pune › वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Published On: Mar 25 2018 1:51AM | Last Updated: Mar 25 2018 1:38AMपुणे : प्रतिनिधी 

राज्याच्या सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एम.डी., एम.एस., एम.डी.एस.सारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी राज्याच्या प्रवेश कोट्यात केवळ राज्याच्या डोमीसाइल (अधिवास प्रमाणपत्र) एमबीबीएस विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र, त्यावर निर्णय होत नसल्याने प्रवेशाच्या काळजीत असणार्‍या राज्यातील एम.बी.बी.एस. झालेल्या विद्यार्थ्यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने फडणवीस यांची भेट घेऊन पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राज्याच्या डोमीसाइल (अधिवास प्रमाणपत्र) असणार्‍या एमबीबीएस विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मागणी केली आहे. 

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एम.डी., एम.एस., एम.डी.एस.सारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये राज्याच्या 50 टक्के प्रवेश कोट्यात इतर राज्यांमधील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. त्यामुळे डोमीसाइल असणार्‍या महाराष्ट्रातील एम.बी.बी.एस.धारक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याचा मार्ग अधिक खडतर झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे राज्य सरकारने स्थानिक विद्यार्थ्यांना राज्यातील प्रवेश कोट्यात प्रवेश मिळवून देण्याबाबत योग्य पावले उचलावीत आणि सरकारने सर्वोच्च न्यायालयात विद्यार्थ्यांची बाजू मांडावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांनी विधानभवनासमोर काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. तसेच, राज्यातील आमदारांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी लावून धरावी, यासाठी विविध पक्षांच्या आमदारांची भेट देखील घेतली. त्याला सरकारने दाद देत विद्यार्थ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानुसार चालू आठवड्यात याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र, सुनावणी कधी होणार, याबाबत अद्याप कोणतीच माहिती विद्यार्थ्यांना नाही. 
 

 

 

tags : pune,news, access to medical students