Mon, Jun 24, 2019 17:02होमपेज › Pune › संविधान दिन साजरा करणार्‍या विद्यार्थ्यांना ‘रस्टिकेट’ ची धमकी

संविधान दिन साजरा करणार्‍या विद्यार्थ्यांना ‘रस्टिकेट’ ची धमकी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा


पुणे : प्रतिनिधी 

संविधान दिन आणि प्रास्ताविकाचे वाचन करणार्‍या विद्यार्थ्यांना ‘रस्टिकेट’ करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार आबासाहेब गरवारे महाविद्यालयात समोर आला आहे. दरम्यान, विद्यार्थी संघटनांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना घेराव घालत महाविद्यालय प्रशासनाच्या कृतीचा निषेध केला. त्यावर महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना लेखी आश्‍वासन देत दिलगिरी व्यक्त केली. 

आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संविधान दिन आणि 26 / 11 च्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. मात्र, महाविद्यालय प्रशासनाने दिरंगाई करत परवानगी देण्यास टाळाटाळ केली.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोमवारी (दि. 27) रोजी सकाळी संविधान दिनाचा आणि शहिदांना श्रध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम महाविद्यालयात आयोजित केला. त्यावर महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी कार्यक्रम साजरा करणार्‍या विद्यार्थ्यांना बोलावून रस्टिकेट करण्याची धमकी दिली. दरम्यान, हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर शिवसेनेच्या युवा सेना आणि संभाजी ब्रिगेड या विद्यार्थी संघटनांनी आक्रमक होत मंगळवारी प्राचार्यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन केले. सुमारे दोन तास हे ठिय्या आंदोलन चालल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने माघार घेत विद्यार्थ्यांची लेखी दिलगिरी व्यक्त केली.