Mon, Mar 25, 2019 05:32
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › आरती मिसाळ टोळीतील नऊ जणांवर मोक्‍कांतर्गत कारवाई

आरती मिसाळ टोळीतील नऊ जणांवर मोक्‍कांतर्गत कारवाई

Published On: Jan 30 2018 2:17AM | Last Updated: Jan 30 2018 1:36AMपुणे : प्रतिनिधी 

शहरात हेरॉईन, ब्राऊन शुगर या अमली पदार्थांची विक्री करणार्‍या आरती मिसाळ टोळीतील पाच महिला व चार पुरुष अशा नऊ जणांवर पुणे पोलिसांनी मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी कायदा 1999) अंतर्गत कारवाई केली आहे. डिसेंबरमध्ये खडक पोलिसांनी या टोळीकडून सहा लाख रुपये किमतीचे हेरॉईन व चरस जप्त केले होते. अमली पदार्थ विक्री करणार्‍या टोळीवर मोक्काची केलेली ही पुणे शहरातील पहिलीच कारवाई आहे. 

आरती महादेव मिसाळ ऊर्फ आरती विशाल सातपुते ऊर्फ आरती मुकेश चव्हाण (27, इनामके मळा, लोहियानगर), पूजा महादेव मिसाळ ऊर्फ पूजा ज्योतिबा तांबवे (32, लोहियानगर), निलोफर हयात शेख (27, हरकारनगर), अजहर ऊर्फ चुहा हयात शेख (24, हरकारनगर), रॉकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी (23, रामटेकडी, हडपसर), गोपीनाथ नवनाथ मिसाळ (22, लोहियानगर), हुसेन पापा शेख (28, मुंबई), आयेशा ऊर्फ आशाबाई पापा शेख (मुंबई) व जुलैखाबी पापा शेख (मुंबई) अशी मोक्का दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. डिसेंबर महिन्यात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली होती.

 परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संभाजी शिर्के उपनिरीक्षक संजय गायकवाड, अनंता व्यवहारे, कर्मचारी महेश बारवकर, महेश कांबळे, अनिकेत बाबर   यांच्या पथकाने त्यांना पकडले. त्यानंतर पोलिस प्रशासनाने त्यांच्याविरोधात   मोक्कानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले. याबाबतचा पुढील तपास शहर विभागाचे सहायक पोलिस आयुक्‍त किशोर नाईक करीत आहेत.