Thu, Jul 18, 2019 08:04होमपेज › Pune › दैनंदिन कामकाज तपासणीसाठी पथके

दैनंदिन कामकाज तपासणीसाठी पथके

Published On: Feb 12 2018 2:04AM | Last Updated: Feb 11 2018 11:55PMपुणे : प्रतिनिधी

पालिकेच्या प्रत्येक विभागाच्या कामकाजाची गतीमानता आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी प्रशासनाने त्यांच्या कामकाजाची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभाग आणि लेखापाल विभागाच्या प्रत्येकी दोन कर्मचार्‍यांची पाच पथके तयार केली आहेत.  महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागात दररोज नागरिकांची आणि शासकीय कामांची प्रकरणे दाखल होतात. त्यावर निर्णय घेण्यासाठी विहीत मुदतीचा कालावधी निश्चित करून दिला आहे. मात्र, त्यानंतरही काही विभागांमध्ये  कामे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालिकेच्या प्रत्येक विभागात सुरू असलेल्या दैनंदिन कामकाजाची तपासणी होणार आहे. त्यासाठी सामान्य प्रशासन विभाग आणि लेखापाल विभागाच्या प्रत्येकी 2 कर्मचार्‍यांची पाच पथके तयार केली आहेत. या पथकांच्या माध्यमातून  विभागांच्या कामकाजाची तपासणी केली जाणार आहे.

यात प्रामुख्याने विभागाच्या आर्थिक कामकाजाची, पंतप्रधान तक्रार निवारण प्रणाली, आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली, लोकसेवा हमी कायदा, तसेच पालिकेच्या विभागाअंतर्गत निर्णय प्रक्रियांसाठी केल्या जाणार्‍या कामकाजाच्या माहितीची तपासणी होईल. पालिका प्रशासनाकडून या पुढे सर्व विभागांना आपल्या दैनदिन कामांचा मासिक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक विभागाने कोणत्या महिन्यात कोणती कामे केली याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे एकत्रित नसते त्यातच; केवळ आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, महापौर अथवा इतर पदाधिकार्‍यांनी विचारणा केल्यानंतरच ही माहिती विभाग प्रमुख संकलित करतात, अनेकदा स्थायी समिती अथवा इतर समित्यांच्या बैठकीतही प्रशासनास ही माहिती सादर करता येत नाही. त्यामुळे या पुढे सर्व विभागांना प्रत्येक महिन्याच्या तीन तारखेला हे अहवाल अतिरिक्त आयुक्त विशेष यांना सादर केले जाणार आहेत. त्याबाबतचे आदेशही  दिले आहेत.