Mon, Aug 19, 2019 00:54होमपेज › Pune › मोफत ‘वाय-फाय’ची हवा नावापुरतीच

मोफत ‘वाय-फाय’ची हवा नावापुरतीच

Published On: Mar 06 2018 1:02AM | Last Updated: Mar 06 2018 12:00AMवारजे : प्रतिनीधी 

महापालिका निवडणुकीस नुकतेच वर्षे उलटले आहे.  निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवाराकडून वर्षपूर्तीचे शुभेच्छा संदेश सोशील मीडियावर अनेकांकडून सोडले जात आहेत. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचे आणि मोफत  वाय - फाय सेवेसारख्या योजनाना मात्र खिळे बसल्याचे दिसत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरासह उपनगरात ही इच्छुक उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक उपक्रमांसह नियोजित करण्यात आलेली मोफत वाय - फाय सेवा आता जनतेला विना वापरासह फक्त वर्षपुर्तीच्या आठवणींमध्येच राहिली असल्याचे दिसत आहे.

विस्तीर्ण पसरलेल्या आणि असंख्य लोकसंख्या असलेल्या वारजे, कर्वेनगर प्रभागांमध्ये निवडणुकीच्या तोंडावर विविध राजकीय पक्षांसह  इच्छुक उमेदवारांकडून गार्डन शेजारी, पक्ष  कार्यालयाच्या जवळ , शाळा, कॉलेज, गर्दीच्या  ठिकाणी तसेच  जॉगींग ट्रॅक शेजारी मोफत वाय - फाय सेवा गाजावाजा करीत मान्यवरांच्या हस्ते मोठी उद्घाटने करत सुरू करण्यात आली होती. या वायफाय सेवेने अवघ्या महिन्याभरात महापालिका  निवडणूक संपताच  मान टाकली  आहे. त्यामुळे स्मार्ट पुणे सिटीचा टेंभा मिरविणार्‍या  या शहरातील तरुणाईला जलद इंटरनेट सेवेसाठी  मॉल्स किंवा बड्या रेस्टॉरेंटचा आधार घ्यावा लागत आहे.

तसेच माहिती व तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असताना ऑनलाईन अर्ज दाखल करणे, मनी ट्रान्स्फर, पेटीएम, ऑनलाईन बिझनेस या सारख्या अनेक गोष्टींसाठी इंटरनेट वापराचे प्रमाणही लक्षणीय आहे.  अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागवणा-या सामान्य नागरिकांना ऑनलाईन व्यवहार व कामकाजासाठी मात्र खिशाला खिळ बसत आहे. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या अनेक इच्छुकांकडून आपापल्या प्रभागातील नागरिकांना मोफत वाय-फाय सेवेचा ट्रेलर दाखविण्यात आला. मात्र निवडणुकीचा फड संपताच वाय-फाय सुविधेचा खेळही संपुष्टात आला असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.