Fri, Apr 26, 2019 09:20होमपेज › Pune › सावकाराच्या जाचातून एकाची गळफास घेऊन आत्महत्या

सावकाराच्या जाचातून एकाची गळफास घेऊन आत्महत्या

Published On: Mar 25 2018 1:51AM | Last Updated: Mar 25 2018 1:20AMपुणे /खडकी : प्रतिनिधी

सावकाराच्या जाचाला कंटाळून एका भाजी विक्रेत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खडकी परिसरात घडली. धक्कादायक म्हणजे, नातेवाईक पोलिसांकडे तक्रार देण्यास गेल्यानंतर पोलिसांनी तक्रार न घेता पंधरादिवसानंतर येण्यास सांगितले, असे नातेवाईकांनी सांगितले आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेमुळे संशय व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

विनोद प्रल्हाद साठे (वय 37 रा. गाडीअड्डा, लक्ष्मी कॉलनी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  विनोद यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय होता. दरम्यान त्यांना आर्थिक चणचण सुरु होती. दरम्यान त्यांनी खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते. सावकार सतत विनोद यांच्याकडे पैशांची मागणी करत होता. त्यामुळे विनोद यांनी त्यांचा मावस भाऊ चंदन यांच्याकडे पंधरा हजार रुपये सावकाराला देण्यासाठी मागितले होते. मात्र, अडचणीत असल्याने चंदनने तेही पैसे दिले नाहीत. आर्थिक अडचण व सावकाराकडून होणार पैशांचा तगादा यातून विनोद यांनी शुक्रवारी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटननेची माहिती मिळाल्यानंतर खडकी पोलिसांनी तेथे धाव घेतली. दरम्यान विनोद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी विनोद यांचे नातेवाईक व मावस भाऊ चंदन साठे यांनी पोलिसांना विनोद यांनी सावकाराच्या जाचातून आत्महत्या केल्याचे सांगितले. तसेच, आमची तक्रार घेण्याची विनंती केली. मात्र, पोलिसांनी आधी सर्व विधी ऊरकून घ्या. त्यानंतर पंधरा दिवसांनी येण्यास सांगितले, अशी माहिती चंदन साठे यांनी दिली. याबाबत वरिष्ठ निरीक्षक लक्ष्मण बोराटे यांना विचारले असता त्यांनी अद्याप नातेवाईकांनी अशी तक्रार दिलेली  नसल्याचे सांगितले. 
 

 

 

tags : pune,news,Vegetable, vendors,Vinod, Prahlad, Sathe, Suicide,