Mon, Apr 22, 2019 11:43होमपेज › Pune › पुणेकरांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी

पुणेकरांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी

Published On: Aug 20 2018 1:40AM | Last Updated: Aug 20 2018 1:37AMपुणे : प्रतिनिधी

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे विचार हे प्रेरणादायी असून त्यामाध्यमातून ते नेहमी आपल्यात आहेत. स्व. अटलजींनी पक्षाच्या पलीकडे जाऊन विचार करण्यास शिकवले. अशा शब्दात सर्व पक्षीय नेते, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनी अटलजींबद्दल भावना व्यक्त केल्या.

 पुणेकर नागरिक  आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, आ. नीलम गोर्‍हे, शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी, आमदार भिमराव तापकीर, आमदार योगेश टिळेकर, भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले, अभय फिरोदीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, राहूल सोलापूरकर यांच्यासह सर्व पक्षातील नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सामान्य कायकर्ता, पत्रकार ते पंतप्रधान पदापर्यंत झेप घेणार्‍या स्व. अटलजींनी पक्षाच्या पलिकडे जाऊन प्रेम करायला शिकवले. वक्तृत्त्वशैलीतून समोरच्याला आपल बनवण्याचे सामर्थ्य अटलजींमध्ये होते. पराभव समोर दिसत असतानाही सत्तेची स्वप्ने न पाहता देशाच्या विकासाची स्वप्ने पाहणार्‍या अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणे हिच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, अशी भावना पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केली. महापौर टिळक म्हणाल्या, अटलजी आयुष्यभर स्वयंसेवकाच्या भूमिकेत राहिले. याचमुळे त्यांची कार्यकर्त्यांशी नाळ जोडली गेली. आयुष्यभर केलेल्या संघर्षामुळे आज प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात अटलजींचे स्थान आहे. आ. नीलम गोर्‍हे म्हणाल्या, पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत अटलजींनी राजकीय भूमिका घेत असताना अनेकदा विरोध झाला. मात्र, अटलजींनी संयमाची भूमिका घेत विरोधकांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. अटलजींनी पंतप्रधान असताना अनेक देशहिताची कामे करुन देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शरद रणपिसे, चेतन तुपे, रमेश बागवे, राहूल सोलापूरकर, अभय फिरोदीया, पं. वसंतराव गाडगीळ आदींनी भावना व्यक्त केली. योगेश गोगावले यांनी सूत्रसंचालन केले.