होमपेज › Pune › वाघोलीचा वाहतूक प्रश्‍न सुटणार

वाघोलीचा वाहतूक प्रश्‍न सुटणार

Published On: Mar 07 2018 1:55AM | Last Updated: Mar 07 2018 1:23AMपुणे : प्रतिनिधी

झपाट्याने विकसित होत असलेल्या वाघोलीच्या विकासासाठी ‘पीएमआरडीए’ने पुढाकार घेतला आहे. सर्वात जटील असलेला वाहतूक प्रश्‍न कायमचा सोडविण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पावले उचलली असल्याची माहिती ‘पीएमआरडीए’चे आयुक्त किरण गित्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली. गित्ते म्हणाले, वाघोलीमध्ये तासाला सात हजार वाहने ये-जा करतात. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे. ती सोडविण्यासाठी तीन ठिकाणी क्रॉसिंगची यंत्रणा उभारण्याबरोबरच वाघोलीतून बायपास रस्ता केला जाणार आहे. वाहतूक कोंडी, कचर्‍याचा प्रश्न, पाणीपुरवठा याबाबत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी ‘पीएमआरडीए’ काम करीत आहे.

शिरूर येथील रांजणगाव एमआयडीसीबरोबरच या परिसरात अनेक औद्योगिक कंपन्यांमध्ये काम करणार्‍या नोकरदार वर्गाचा बराच वेळ या रस्त्यावरील वाहतूक कोंडीमध्ये जातो. त्यामुळे या परिसरातील नागरिकांबरोबरच औद्योगिक कंपन्यांची या वाहतुकीची समस्येतून सुटका करण्याची मागणी आहे. याविषयी जिल्हा प्रशासनाकडेही बैठका झाल्या आहेत. आता हा परिसर प्राधिकरणाच्या हद्दीत समाविष्ट झाला आहे. त्यामुळे सर्वात महत्वाची वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी प्राधिकरणाकडून प्राधान्य दिले जात आहे, असे गित्ते यांनी सांगितले.

वाघोलीसाठी लवकरच पाणीपुरवठा योजना हाती घेतली जाणार असून, भामा आसखेड धरणातून अथवा इंद्रायणी नदीतून पाण्याची व्यवस्था केली जाणार  आहे. यासाठी प्राधिकरण एकूण प्रकल्पाच्या 30 टक्के खर्च करण्यास तयार आहे. त्याचबरोबर कचर्‍याचाही प्रश्न सोडविण्यात येणार आहे. नगर रस्त्यावर केसनंद, आव्हाळवाडी आणि वाघोली य तीन ठिकाणी क्रॉसिंगची यंत्रणा उभारली जाणार आहे. यासाठी सुमारे 7 कोटी 50 लाख रुपये खर्च केला जाणार आहे. त्याचबरोबर वाघोली येथून बायपास रस्ता तयार करण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक शेतकर्‍यांशी चर्चा करूनच भूसंपदानाचा निर्णय घेतला जाणार आहे, असेही गित्ते यांनी सांगितले.