Wed, Mar 20, 2019 23:27होमपेज › Pune › नगराध्यक्षपदाच्या सोडतीनंतर वडगावात राजकीय डावपेचांना सुरुवात

नगराध्यक्षपदाच्या सोडतीनंतर वडगावात राजकीय डावपेचांना सुरुवात

Published On: Jun 02 2018 2:03AM | Last Updated: Jun 01 2018 11:36PMवडगाव मावळ : गणेश विनोदे

वडगाव नगरपंचायतीच्या महिनाभरात होणार्‍या निवडणुकीच्या दृष्टीने नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीनंतर राजकीय डावपेचांना सुरुवात झाली असून, भाजप व काँग्रेस एकमेकांना आव्हान देण्याच्या तयारीत आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहे.

नगराध्यक्षपदाच्या सोडतीमुळे शहरातील राजकीय वातावरण काहीसे थंडावले होते; परंतु बुधवारी नगराध्यक्षपदाची सोडत होऊन ते सर्वसाधारणसाठी खुले झाल्याने प्रथम नगराध्यक्ष होण्याची इच्छुकांची आशा बळावली असून, आता त्यादृष्टीने जय्यत तयारीही सुरू झाली आहे.

दरम्यानच्या काळात सर्वच पक्षांच्या दृष्टीने नगराध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे काँग्रेसचे पंढरीनाथ ढोरे यांनी निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने पक्षाची भूमिका योग्य नसल्याच्या कारणातून सर्व पदांसह काँग्रेस पक्षाला रामराम केला आणि राष्ट्रवादीलाही हुलकावणी देत थेट भाजपमध्ये प्रवेश केला.

या घडामोडीमुळे ‘पुढारी’ने वर्तविलेला मोठ्या राजकीय कलाटणीचा अंदाज खरा ठरला असून, आता भाजप पंढरीनाथ ढोरे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देऊन पुन्हा विरोधकांपुढे आव्हान उभे करणार का, याची उत्सुकता लागली आहे; तसेच नगराध्यक्षपदासाठी्र इच्छुक असलेले काँग्रेसचे मयूर ढोरे यांच्यापुढे कडवे आव्हान उभे राहिल्यास काँग्रेस कोणती रणनीती आखणार याकडे वडगावकरांचे लक्ष आहे. तर या राजकीय घडामोडीत ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या आव्हानांचा सामना करण्यासाठी नेमकी काय 
भूमिका घेणार यावरच पुढील गणिते ठरणार असल्याचे दिसते.

याशिवाय, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या नाराजीतून शिवसेनेचाही पर्याय निर्माण होण्याची शक्यता असून, सर्वच पक्षांकडून प्रभागनिहाय सक्षम उमेदवार देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याने नगरपंचयातच्या महिनाभरात होणार्‍या निवडणुकीच्या दृष्टीने खर्‍या अर्थाने राजकीय डावपेचांना सुरुवात झाली असल्याचे दिसते आहे.