Mon, Jul 22, 2019 03:38होमपेज › Pune › ‘व्हीआयपी’रक्षणाय! 

‘व्हीआयपी’रक्षणाय! 

Published On: Sep 03 2018 1:40AM | Last Updated: Sep 03 2018 1:34AMअक्षय फाटक

पुणे :

पुण्यातील साडेतीनशे नागरिकांमागे एक पोलिस अशी अवस्था त्यातच गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असताना 8 महिन्यांत 127 व्हीआयपींसाठी तब्बल 15 हजार पोलिसांच्या बंदोबस्ताची व्यवस्था करावी लागली आहे. ही सुरक्षा गरजेची असली तरी नागरिकांच्या सुरक्षेमध्ये हयगय होऊ नये म्हणून  यावर पर्याय शोधण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
 शहरात व्हीआयपींचा दौरा ठरल्यानंतर पोलिसांचे कामकाज सुरू होते. दोन दिवस आधी या व्हीआयपींच्या दौर्‍याची माहिती दिली जाते. त्यानंतर पोलिसांची विशेष शाखा हा विभाग व्हीआयपींच्या संपूर्ण दौर्‍याची तयारी करतो. बहुतांश व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींचे विमानाद्वारे आगमन होते. तिथपासून त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस दिमतीला हजर असतात. 
प्रथम विशेष शाखा बंदोबस्तासाठी मुख्यालयातील कर्मचारी व अधिकारी ठरवतात. नंतर वाहतूक पोलिस आणि त्या-त्या भागातील स्थानिक पोलिसांचा गरजेनुसार बंदोबस्त ठेवला जातो. विमानतळ ते कार्यक्रमस्थळापर्यंत या तीन विविध विभागातील जवळपास 200 ते 250 अधिकारी व कर्मचारी तैनात असतात. काही वेळा एकाच दिवशी शहरात दोन ते तीन व्हीआयपी असतात. त्यावेळी साधारणत: हजार कर्मचारी रस्त्यांवर असतात. पोलिसांची मोठी कसरत होते.  त्यातही शहरात येणारे व्हीआयपी नेमके शनिवार आणि रविवार गाठून येतात. त्यामुळे वरिष्ठांसह  कर्मचार्‍यांना सुटीलाही मुकावे लागते. पुणे शहर ही राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. त्यामुळे शहरात वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल असते. दुसरीकडे शहराने 35 लाख लोकसंख्येचा आकडा पार केला आहे. वर्षागणिक ही संख्या वाढत आहे. शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे.

 त्यात वाढत चाललेली वाहतूक समस्या अन् गुन्हेगारीकरणाला अपुर्‍या मनुष्यबळावर तोंड देता-देता पोलिसांच्या नाकी नऊ येत आहेत. पुणेकरांची सुरक्षा, गुन्हेगारीचा अटकाव अन् गुन्ह्यांची उकल करण्याबरोबरच पोलिसांना या व्हीआयपींच्या बंदोबस्ताने ग्रासले आहे.  यासोबतच राज्यातील काही महत्वाची कार्यालये पुण्यात आहेत. त्याठिकाणीही अनेक वेळा पोलिसांना  वेगवेगळ्या कारणांमुळे हजर रहावे लागते. अनेक बडे राजकीय असामीही शहरात वास्तव्यास आहेत. त्यामुळे एकूणच पुणे पोलिसांना कायम वेगवेगळ्या बंदोबस्तासाठी तैनात रहावे लागत आहे. काही पोलिस ठाणे तर दररोज होणारी आंदोलनाच्या बंदोबस्ताने  हैराण झाली आहेत.  

आठ महिन्यांचा  बंदोबस्त वाहतूक विभाग

सहायक उपायुक्त 152, पोलिस निरीक्षक 358,पोलिस उपनिरीक्षक    806,पोलिस कर्मचारी 8,421 इतर बंदोबस्त : पुणे पोलिसांना व्हीआयपींसोबतच उत्सव आणि सणासाठीही बंदोबस्त पार पाडावे लागतात. पुणे शहराला सांस्कृतिक वारसा आहे. पुण्यातील गणेशोत्सवासाठी राज्य व देशभरातून भाविक येतात. त्यामुळे सर्वात महत्वाचा बंदोबस्त याकालावधीत असतो. त्यासोबतच, नवरात्र, दिवाळी, बकरी ईद, जयंती यासह वेगवेगळे बंदोबस्त सुरूच असतात.