Sun, Nov 18, 2018 11:20होमपेज › Pune › विद्यापीठात बाटलीबंद पाणी होणार हद्दपार

विद्यापीठात बाटलीबंद पाणी होणार हद्दपार

Published On: Jan 14 2018 1:53AM | Last Updated: Jan 14 2018 1:32AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परिसर पर्यावरणपूरक म्हणून ओळखला जात आहे. विद्यापीठातील हे वातावरण टिकवण्यासाठी आणि पाण्याची, पैशाची आणि प्लॅस्टिकची उधळपट्टी रोखण्यासाठी बाटलीबंद पाणी देण्याऐवजी कपामध्ये पाणी देण्याचे प्रयत्न केेले जाणार असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, रोटरी क्लबची सिंहगड रोड शाखा आणि जाणीव युवा फाउडेशन यांच्या वतीने आयोजित वॉटर ऑलिंपियाड स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठात करण्यात आले. या वेळी डॉ. करमळकर बोलत होते. या वेळी प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, रोटरी क्लबचे अशोक भंडारी, सतीश खाडे, ‘प्रोटॉन जल’चे रावसाहेब पवार, विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख डॉ. सुरेश गोसावी, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई  उपस्थित होते. ऑलिंपियाडअंतर्गत विविध प्रकल्प, पोस्टर्स, पेपर प्रेझेंटेशन, लघुपट, विविध सूचना यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत.

डॉ. करमळकर म्हणाले की, विद्यापीठात शुद्ध पाणी देण्याची यंत्रणा ठिकठिकाणी बसवण्यात आलेली आहे.  पाण्याची बचत करण्यासाठी पाणी कपातून दिले तरी चालू शकेल, असे करमळकर या वेळी म्हणाले. रोटरी क्लबच्या पाणीविषयक पुढाकाराचे कौतुक करत ऑलिंपियाडमध्ये विजयी विद्यार्थ्यांना परदेशात पाठवण्यात येणार्‍या शिष्यवृत्तीसाठीचा निम्मा प्रवासखर्च विद्यापीठ उचलेल, असेही डॉ. करमळकर यांनी या वेळी सांगितले. या वेळी प्रमोद चौधरी, अशोक भंडारी आणि सतीश खाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. ‘जाणीव युवा फाउंडेशन’चे डॉ. गबाले यांनी सूत्रसंचालन केले.