Wed, Jun 26, 2019 18:18होमपेज › Pune › किमान आधारभूत किमतीने 275 कोटींची तूर खरेदी पूर्ण

किमान आधारभूत किमतीने 275 कोटींची तूर खरेदी पूर्ण

Published On: Mar 07 2018 1:55AM | Last Updated: Mar 07 2018 1:25AMपुणे  : प्रतिनिधी

राज्यात किमान आधारभूत किंमतीने (एमएसपी) तुरीची 188 केंद्रांवर 4 लाख 90 हजार 218 क्विंटल इतकी खरेदी पूर्ण झाली आहे. सुमारे 274 कोटी 13 लाख रुपयांची ही तूर आहे. तूर खरेदीने आता वेग घेतला असून, 45 लाख क्विंटल खरेदीच्या एकूण उद्दिष्टाचा विचार करता, सध्या केवळ दहा टक्केच तूर खरेदी पूर्ण झालेली असल्याची माहिती पणन संचालनालयातून देण्यात आली. तुरीची आधारभूत किंमत क्विंटलला 5 हजार 450 रुपये निर्धारित करण्यात आलेली आहे. खरेदी उशिराने सुरू झाल्यामुळे 

मध्यंतरी तुरीचे भाव कमी झाल्याने शेतकर्‍यांची ओरड सुरू होती.  आता नियमितपणे खरेदी सुरू असून, राज्यात नाफेडच्या वतीने मार्केटिंग फेडरेशन तुरीची खरेदी करीत आहे. फेडरेशनच्या 165 खरेदी केंद्रांवर एकूण 32 हजार 752 शेतकर्‍यांची 3 लाख 62 हजार 798 क्विंटल तुरीची खरेदी पूर्ण झाली आहे. 1 फेब्रुवारीपासून तुरीची खरेदी सुरू झालेली असून बीड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, वर्धा, बारामती-पुणे येथील केंद्रांवर ही खरेदी होत आहे. खरेदी केलेल्या तुरीपैकी गोदामांमध्ये 1 लाख 41 हजार 599 क्विंटल तुरीची साठवणूक करण्यात आलेली आहे. उर्वरित 2 लाख 21 हजार 166 क्विंटल तूर केंद्रावरच आहे. 

याशिवाय विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनकडूनही तूर खरेदी सुरू आहे. 23 केंद्रांवर मिळून 1 लाख 27  हजार 420 क्विंटल तुरीची खरेदी पूर्ण झाली आहे. एकूण 10 हजार 402 शेतकर्‍यांची ही तूर आहे.  खरेदी केलेल्या तुरीपैकी गोदामांमध्ये 99 हजार 751 क्विंटल तूर ठेवण्यात आलेली आहे. उर्वरित 27 हजार 668 क्विंटल तूर ही खरेदी केंद्रावर ठेवण्यात आहे. या तुरीची किंमत 76 कोटी 41 लाख रुपये आहे. विशेषतः बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, अकोला, अमरावती येथे ही खरेदी सुरू असल्याचे पणन विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले. 

दरम्यान, तूर खरेदीचे 74 कोटी 7 लाख रुपये शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेले असून, उर्वरित रक्कमही  जमा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्याचा ताजा अहवाल अद्याप प्राप्त नसल्याचे सांगण्यात आले.