Sun, Apr 21, 2019 00:22होमपेज › Pune › सायबर दरोडेखोरांना धडा शिकवणार

सायबर दरोडेखोरांना धडा शिकवणार

Published On: Aug 19 2018 1:29AM | Last Updated: Aug 19 2018 1:12AMपुणे : प्रतिनिधी

 कासमॉस बँकेवर झालेल्या सायबर दरोड्याच्या पार्श्‍वभूमीवर सायबर गुन्हेगारांना धडा शिकविण्यासाठी राज्यातील नागरी सहकारी बँका एकत्र आल्या आहेत. भविष्यातील सुरक्षेसाठी कॉमन नॉलेज हब, फसवणूक रोखण्यासाठी ग्राहकांना प्रशिक्षण; तसेच जबाबदारी झटकणार्‍या नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाला न्यायालयात खेचण्याचा निर्णय शनिवारी पुण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या वेळी नागरी सहकारी बँक फेडरेशनचे पदाधिकारी, कॉसमॉस बँकेच्या अध्यक्षांसह राज्यातील 150 बँकांचे पदाधिकारी, आयटी सेलचे प्रमुख आणि तज्ज्ञ उपस्थित होते.

कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला झाल्यानंतर सहकारी बँकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आल्याने फेडरेशनने राज्यातील सर्व सहकारी बँकांना एकत्र केले. हा एका बँकेवर झालेला हल्ला नसून सहकारवर हल्ला झाल्याने ‘कॉसमॉस’ बँकेमध्ये ठेवी असणारी एकही बँक रक्कम परत काढणार नाही आणि सर्व बँका ‘कॉसमॉस’च्या पाठीशी ठामपणे राहून ‘सहकारासाठी बँकांचा सहकार’ हा संदेश देण्याचा निर्णय घेतला.

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या तावरे कॉलनीतील सभागृहात ही बैठक झाली.

दरवषी सर्व बॅकांचे आयटी ऑडीट होते. यामध्ये सायबर व्यवहारातील  सुरक्षेच्या दृष्टीने ज्या त्रुटी अ्राढळतात त्या इतर बँकांकडून होऊ नयेत यासाठी ‘कॉमन नॉलेज हब’ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षेविषयक बँकानी काय काळजी घ्यावी याबाबत जिल्हास्तरावर असोसिएशन आणि राज्यस्तरावर फेडरेशन कार्यरत राहणार आहे. एका कॉमन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हब कार्यरत राहिल. ज्या बँकांमध्ये आयटी सुरक्षेमध्ये त्रुटी दिसतील त्या या हबच्या माध्यमातून एकत्र केल्या जातील. सबंधित बँकेचे नाव गोपनीय ठेऊन एकत्रित येणार्‍या त्रुटींबाबत काय काळजी घ्यावी, याबाबतचे मार्गदर्शन एका वेबसाईटच्या माध्यमातून बँक आणि ग्राहकांना दिली जाईल. त्याचप्रमाणे कॉसमॉस बँकेबाबतचा तपास पुर्ण झाल्यावर नेमक्या काय त्रुटी राहिल्या यावर अभ्यास करुन सायबर हल्ले रोखण्यासाठी सर्व बँकांना मार्गदर्शनपर पुस्तिका देण्याचा निर्णय घेण्यात आला. सायबर हल्ले रोखण्यासाठी ग्राहकांमध्ये जागृकता महत्वाची असल्याने सर्व बँकांनी सायबर व्यवहाराबद्दल उपक्रम राबवून ग्राहकांना सातत्याने प्रशिक्षण देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. 

इंटरनॅशनल स्वीचच्या माध्यमातून स्थानिक बँकांच्या परदेशातून होणार्‍या गैरव्यवहारांना नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाला जबाबदार धरण्यात आले पाहिजे, अशी चर्चा झाली. कॉसमॉस बँकेच्या प्रकरणामध्ये नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने जबाबदारी झटकली आहे. पोलिस आणि इतर यंत्रणांचा तपास पूर्ण होऊन अहवाल आल्यानंतर त्यांना उच्च न्यायालयात खेचण्याचा निर्णयही यावेळी एकमताने घेण्यात आला.

कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी सायबर हल्ला नेमका कसा झाला याबाबत उपस्थितांना माहिती दिली. असे हल्ले रोखण्यासाठी बँकांतील आयटी विभागातील मनुष्यबळारील जबाबदारी किती महत्वाची आहे, हे अधोरेखित झाल्याचे स्पष्ट केले.

आयटी तज्ज्ञ निरंजन फडके, मोहन कामत यांनी सायबर हल्ले नेमके कसे होऊ शकतात आणि त्यावर काय काळजी घेण्याची गरज आहे याबाबत मार्गदर्शन केले. याचपद्धतीने राज्यात बैठका घेऊन जागृती करण्यात येणार असून पुढील बैठक दि. 24 रोजी मुंबईत घेण्याचे जाहिर करण्यात आले.यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, असोसिएशनचे उपाध्यक्ष भरत टकले, कार्यकारी संचालक संगिता कांकरिया तसेच राज्यातील सहकारी बँकांचे अध्यक्ष, पदाधिकारी, आयटी सेलचे प्रमुख उपस्थित होते.