Sun, Jul 21, 2019 09:51होमपेज › Pune › ससूनच्या इमारतीस ‘तारीख पे तारीख’

ससूनच्या इमारतीस ‘तारीख पे तारीख’

Published On: Mar 05 2018 1:57AM | Last Updated: Mar 05 2018 1:42AM पुणे  : प्रतिनिधी

ससूनच्या अकरा मजली इमारतीचे काम पूर्ण होण्यासाठी, ‘तारीख पे तारीख’ दिली जात असून, गेल्या दहा वर्षांपासून इमारतीच्या कामासाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी रंगकाम, प्लंबिंग, खिडक्या, वीज यंत्रणा, लिफट हे महत्त्वाचे काम बाकी आहे. तसेच वैद्यकीय उपकरणे खरेदी करून या इमारतीचे उद्घाटन होण्यास आणखी दोन वर्षे उजाडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रात सुपर स्पेशालिटी उपचार करणारे आणि 1296 खाटांची क्षमता असलेले ससून हे एकमेव रुग्णालय आहे. या रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यासाठी राज्य शासनाने 2008 मध्ये नवीन अकरा मजली इमारत बांधण्यास परवानगी दिली. त्यानुसार इमारतीचे बांधकामही सुरू झाले व ते 2011 ते 12 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. पण, सार्वजनिक बांधकाम विभागाची चालढकल, निधीस मंजुरी मिळण्यास होणारा उशीर,  प्रशासन व बांधकाम विभागांमधील टक्केवारीचे गणित न जुळल्यामुळे ही इमारत पूर्ण होण्यासाठी तीन वर्षांऐवजी तब्बल दहा वर्षे उलटली आहेत. तरी अजूनही इमारतीचे काम पूर्ण झालेले नाही. 

या इमारतीमध्ये बाह्यरुग्ण विभाग नसेल; केवळ आंतररुग्ण विभाग राहणार आहे. यामध्ये खासगी रुग्णालयाप्रमाणेच उच्च दर्जाच्या वैद्यक ीय सुविधा असणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक गरीब रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे. इमारतीचे काम पूर्ण झाल्यावर खाट, शस्त्रक्रियागृहांची बांधणी, इतर वैद्यकीय उपकरणे, वातानुकूलित यंत्रणा, नर्सिंग स्टेशन्स आदींची व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र शासनाकडून निधीस मंजुरी लवकर मिळत नसल्याने हे काम लांबणीवर पडत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याकडून देण्यात आली.