Fri, Apr 26, 2019 17:22होमपेज › Pune › अभिमत शब्द वापरा, नाही तर कारवाई

अभिमत शब्द वापरा, नाही तर कारवाई

Published On: Dec 02 2017 2:09AM | Last Updated: Dec 02 2017 1:20AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

राज्यातील सर्व अभिमत विद्यापीठांना त्यांच्या नावामध्ये केवळ विद्यापीठ हा शब्द न वापरता ‘अभिमत’ विद्यापीठ असा शब्द वापरावा, अशा स्पष्ट सूचना यूजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने 3 नोव्हेंबर रोजी 123 विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना दिली होती. परंतु, याबाबतीत देशातील 7 विद्यापीठे आणि 22 शैक्षणिक संस्थांना गांभीर्य नसल्याचे यूजीसीच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या सर्व शैक्षणिक संस्थांना गुरुवारी दुपारी चार वाजेपयर्र्ंत अभिमत शब्द वापरून नवे नाव पाठविण्याच्या सूचना यूजीसीने केल्या आहेत. तसेच नाव न पाठवल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.

देशातील अनेक अभिमत विद्यापीठे सर्रास केवळ विद्यापीठ हे नाव वापरताना दिसतात. त्यामुळे दर वर्षी नव्याने शिक्षण व्यवस्थेत येणार्‍या विद्यार्थ्यांची मात्र फसवणूक होण्याची शक्यता आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने एका केसच्या सुनावणीच्या वेळी यूजीसीच्या लक्षात आणून दिले होते. त्यानुसार यूजीसीने 3 नोव्हेंबर रोजी 123 विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांची नावे संकेतस्थळावर जाहीर केली होती. तसेच, न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना त्यांच्या नावात बदल किंवा नावात ‘अभिमत’ विद्यापीठाचा वापर करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या.

यामध्ये महाराष्ट्रातील 20 शैक्षणिक संस्था व अभिमत विद्यापीठांचा समावेश आहे. यूजीसी कायद्याच्या कलम 23 नुसार अभिमत विद्यापीठांना केवळ विद्यापीठ हा शब्द वापरता येणार नसल्याचे यूजीसीने संबंधित विद्यापीठे, तसेच शैक्षणिक संस्थांना कळवले होते. त्यानंतर महिनाभरातच या विद्यापीठांनी अभिमत विद्यापीठ हा शब्द वापरण्यास सुरुवात करावी किंवा विद्यापीठ नाव वापरू नये, अशा सूचनाही यूजीसीने दिल्या होत्या. परंतु सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीसोबत देशातील एकूण सात विद्यापीठे आणि बावीस शैक्षणिक संस्थांनी सुधारित नाव यूजीसीला पाठविले नव्हते. त्यामुळे यूजीसीने बुधवारी पुन्हा  विद्यापीठे आणि संस्थांना नावे पाठविण्याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत.

तसेच गुरुवारी चार वाजेपर्यंत नाव न पाठवल्यास कारवाईचा इशारादेखील दिला आहे. यासंदर्भात सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर म्हणाल्या, की देशात आंतरराष्ट्रीय पातळीची दहा खासगी व दहा सार्वजनिक विद्यापीठे करण्याचा केंद्र शासनाचा मानस असताना यूजीसीच्या या विद्यापीठांच्या नावात अभिमत शब्द वापरण्याच्या निर्णयामुळे खासगी विद्यापीठांच्या प्रतिमेवर प्रतिकुल परिणाम होण्याची शक्यता आहे. तरीदेखील सध्याच्या परिस्थितीनुसार सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने नावात ‘अभिमत’ शब्दाचा वापर करून नवे नाव यूजीसीला पाठविले आहे.