Fri, Apr 26, 2019 01:56होमपेज › Pune › जोडप्यांच्या पसंतीस उतरले तांबी, निरोध

जोडप्यांच्या पसंतीस उतरले तांबी, निरोध

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे  ; ज्ञानेश्‍वर भोंडे

गर्भनिरोधक साधनांचा वापर करण्याबाबत जननक्षम वयोगटातील शहरी विवाहित जोडप्यांना तांबी आणि निरोध ही दोन साधने पसंतीस पडली आहेत; तर गर्भनिरोधक गोळी टाळली जात आहे; पण ग्रामीण भागात तांबी, निरोध यांच्यासह गर्भनिरोधक गोळीलाही तितकेच प्राधान्य देण्यात येत आहे.  राष्ट्रीय आरोग्य अभियानद्वारे राज्यात ‘रिप्रोडेक्टिव्ह चाईल्ड हेल्थ’ हा कार्यक्रम राबवला जातो. या अंतर्गत जननक्षम वयोगटातील विवाहित जोडप्यांची (15 ते 49)  नोंद महापालिकेच्या व जिल्ह्याच्या आरोग्य विभागाकडे ठेवली जाते. ठराविक कालावधीसाठी गर्भधारणा टाळण्यासाठी या जोडप्यांना गर्भनिरोधक साधनांचे मोफत वाटप महापालिका आणि जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने केले जाते.

शहरातील जोडप्यांकडून तांबी आणि निरोध यांचा सर्वाधिक वापर करण्यात येत आहे. तर गर्भनिरोधक गोळयांचा वापर कमी झाला आहे. त्याचे कारण म्हणजे तांबी एकदा महिलेने बसवल्यास तीन वर्षापासून दहा वर्षापर्यंत त्याचा वापर गर्भधारणा टाळण्यासाठी करता येतो. तांबी आता गर्भपात केला किंवा सिझेरियन केले तरी बसवता येते. तसेच त्याचे दुष्परिणामही कमी आहेत. त्याचप्रमाणे निरोधाचे दुष्परिणाम अत्यंत कमी असल्याने हे साधनदेखील जोडप्यांच्या पसंतीस पडत आहे; पण निरोध फाटण्याची भीती असण्याची शक्यता असल्याने गर्भधारणा राहू शकते, अशी माहिती महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.इतर गर्भनिरोधक साधनांच्या तुलनेत गर्भनिरोधक गोळयांचे फायदे कमी व तोटेच अधिक असतात.

याची सर्वात मोठी अडचण म्हणजे ही गोळी रोज घ्यावी लागते आणि अनेक महिला रोज गोळी घ्यायला विसरतात, त्यामुळे गर्भधारणा राहण्याचा धोका वाढतो. त्याचबरोबर गोळ्यांच्या वापराने महिलांमध्ये हार्मोन बदल होणे, मासिक पाळीचे चक्र मागे-पुढे होेणे असे परिणाम होऊ शकतात, म्हणून जोडप्यांच्या पसंतीला हा पर्याय कमी प्रमाणात असल्याचे मत स्त्रीरोगतज्ज्ञ खासगीत व्यक्‍त करतात. ही गर्भनिरोधक साधने शहरात प्रत्येक महापालिकेच्या दवाखाने, प्रसूतिगृहे तर ग्रामीण भागात उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोफत मिळतात. पण शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात त्याला जास्त प्रतिसाद मिळत आहे. शहरात अनेक जोडपी ही खासगी औषध दुकानांतून साधने विकत घेतात; पण ग्रामीण भागात आर्थिक आणि उपलब्धता या दोन्ही कारणांमुळे ती आरोग्यकेंद्रातून घेतली जात असल्याचे निरीक्षण आहे.
 

 

 

tags ; pune,news, use,contraceptive, devices,


  •