होमपेज › Pune › सचिन अणदुरेच्या पोलिस कोठडीत ३० ऑगस्टपर्यंत वाढ 

सचिन अणदुरेच्या पोलिस कोठडीत ३० ऑगस्टपर्यंत वाढ 

Published On: Aug 26 2018 7:09PM | Last Updated: Aug 26 2018 7:09PMपुणे : प्रतिनिधी 

बेंगळूरू येथील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या अमोल काळे, अमित दिगवेकर यांच्यासह आणखी एकाने अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंगाने रेकी केल्याची माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेल्या तपासामध्ये उघड झाली आहे. या तिघांना दाभोलकर हत्येप्रकरणी अटक करून त्यांच्याकडे तपास करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे गौरी लंकेश आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमधील कनेक्शन उघड होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, सचिन अणदुरेकडे डॉ. दाभोलकर हत्येच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. आर. जाधव यांनी सचिनला ३० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 

सचिन अणदुरेला अटक झाल्यानंतर त्याला रविवारपर्यंत (ता.२६) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्याची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला आज दुपारी १ वाजून १० मिनिटांनी सीबीआयने न्यायालयात हजर केले. 

२० ऑगस्ट २०१३ रोजी ओकांरेश्‍वर पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंगाने सचिन अणदुरेकडे केलेल्या तपासात सीबीआयने महत्वपूर्ण बाबी उघड केल्या असल्याचे सीबीआयचे विशेष सरकारी वकील विजयकुमार ढाकणे यांनी न्यायालयाला सांगितले. गौरी लंकेश हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने ७.६५ एमएमचे कन्ट्रीमेड पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे सचिन अणदुरेला दिली होती.  ११ ऑगस्ट २०१८ रोजी अणदुरेनेही हे पिस्तुल आणि काडतुसे त्याचा मेव्हणा शुभम सुरळेला औरंगाबाद येथे दिली. दरम्यान, सीबीआयने सुरळेच्या घरी तपास केल्यानंतर त्यांच्याकडे ही पिस्तुल आणि ३ काडतुसे त्याने त्याचा मित्र रोहित राजेश रेगे याच्याकडे ठेवण्यासाठी दिली होती. ती पिस्तुले सीबीआयने रोहित रेगेच्या विघ्नहर्ता बिल्डींग, धावणी मोहल्ला, श्रीमंत गल्ली औरंगाबाद येथून जप्त केली असल्याचा युक्तीवाद अ‍ॅड. ढाकणे यांनी केला. दरम्यान, दाभोलकरांवर हल्ला करण्यासाठीही ७.६५ एमएम या पिस्तुलाचा वापर झाला होता. दरम्यान, रेगे याच्या घरातून जप्त करण्यात आलेले पिस्तुलही ७.६५ एमएमचे असून बॅलेस्टिक अहवालनंतरच डॉ. दाभोलकर हत्येमध्ये या पिस्तुलाचा वापर झाला की नाही ? हे स्पष्ट होण्यासाठी मदत होणार असल्याचे सीबीआय सुत्रांनी सांगितले. 

मेव्हणीने न्यायालयात बांधली राखी 

रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अंदुरे याला बेलापुरवरून न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणी वेळी त्यांचे काही जवळच्या व्यक्ती न्यायालयात आल्या होत्या. रविवारी रक्षाबंधन असल्याने अंदुरेच्या मेव्हणीने त्याला न्यायालयाची परवानगी घेवून कोर्ट हॉलमध्ये राखी बांधली. त्यावेळी अंदुरे यांने तिच्याकडे कुटुंबियांची चौकशी केली. कुटुंबियांनी पाठवलेला ड्रेस देखील सीबीआयच्या तपासणीनंतर त्याला देण्यात आला.