होमपेज › Pune › सहा वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

सहा वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

Published On: Dec 23 2017 2:29AM | Last Updated: Dec 23 2017 2:22AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

 कात्रज परिसरातील एका भाजी विक्रेत्याने सहा वर्षाच्या चिमुरडीला घरी बोलवून मुलीवर चाकूचा धाक दाखवत लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाच वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलांनी सामूहिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार ताजा असतानाच हा प्रकार समोर आल्याने आणखी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. देविलाल उर्फ प्रशांत परमेश्‍वर सागरे (वय 25) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागरे हा कात्रज परिसरात राहण्यास असून त्याचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. 

पीडित चिमुरडी त्याच्या घरी येत जात होती. दरम्यान, ऑगस्ट महिन्यापासून तो या चिमुरडीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार करत होता. मुलीने विरोध केल्यावर तिने तिला चाकूचा धाक दाखवून तिला आणि तिच्या आईला ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून जाऊन तिने आईला काहीच सांगितले नाही. मात्र, काही दिवसांपासून आपल्या मुलीच्या वागणुकीत काही बदल दिसत असल्याने महिलेने मुलीला विश्‍वासात घेऊन तिची चौकशी केली. त्यावेळी खरा प्रकार समोर आला.त्यानंतर महिलेने थेट भारती विद्यापीठ पोलिस ठाणे गाठत सागरे विरोधात तक्रार दिली.  

 कोंढव्यातील मिठानगर परिसरात अल्पवयीन मुलांनी आणि एका अठरा वर्षीय तरुणाने मिळून पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला होता. या घृणास्पद प्रकारानंतर शहरात चांगलीच खळबळ उडाली होती. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातही तसाच गुन्हा दाखल त्याच दिवशी दाखल झाला. लहान मुले आणि मुलींवर होणार्‍या लैंगिक अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने चिमुरड्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.