होमपेज › Pune › बनावट विदेशी मद्याच्या रॅकेटचा पर्दाफाश

बनावट विदेशी मद्याच्या रॅकेटचा पर्दाफाश

Published On: Jan 01 2018 2:02AM | Last Updated: Jan 01 2018 12:18AM

बुकमार्क करा
पुणेे : प्रतिनिधी

नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्‍वभूमीवर  मद्याची विक्री मोठ्या प्रमाणात होते. ही संधी साधून मद्याची तस्करी आणि बनावट मद्य तयार केले जाते. अशाच रॅकेटचा पर्दाफाश उत्पादन शुल्कच्या तळेगाव दाभाडे आणि नारायणगाव येथील पथकाने अवसरी बु. (ता. आंबेगाव) येथे 30 डिसेंबर रोजी संयुक्त कारवाई करून केला आहे.  याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीन वर्षानिमित्त विदेशी मद्य बनावट रिफिलिंग करून बँ्रडेड व्हिस्कीच्या बाटल्यांची वाहतूक केली जात असल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या तळेगाव दाभाडे आणि नारायणगाव येथील पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने अवसरी बु. येथे सापळा लावला.

या दरम्यान संशयित एम.एच.12 एफजे 6851 क्रमांक असलेली चारचाकी कारची तपासणी केली असता, त्यामध्ये विदेशी मद्याच्या 36 बाटल्या मिळून आल्या. कारमधील गोरख नाथू भोर आणि विकास भागवत डोंगरे (रा. अवसरी) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपींकडे चौकशी केली असता, भोर याच्या घरातून विदेशी मद्याच्या 24 बाटल्या मिळून आल्या. त्यांच्याकडून एकूण 1 लाख 16 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई उत्पादन शुल्कचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक मोहन वर्दे, उपअधीक्षक सुनील फुलपगार,  प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव विभागाचे निरीक्षक दीपक परब, उपनिरिक्षक रामचंद्र चवरे, अनिल सुतार,  संजय सराफ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. मुख्य सूत्रधार फरार अवसरी येेथे अनेक दिवसांपासून बनावट विदेशी मद्य तयार केले जात असल्याची माहिती पथकांना मिळाली. त्यानुसार पथकाने नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. बनावट मद्य तयार करणारा मुख्य सूत्रधार योगेश मच्छिंद्र चव्हाण (रा. चव्हाण मळा, अवसरी) हा फरार होण्यात यशस्वी झाला आहे.