Fri, Jul 19, 2019 18:11होमपेज › Pune › संपूर्ण राज्यात रान पेटवू : सुप्रिया सुळे

संपूर्ण राज्यात रान पेटवू : सुप्रिया सुळे

Published On: Feb 12 2018 2:04AM | Last Updated: Feb 12 2018 2:04AMपुणे : प्रतिनिधी

राज्यभरातील मराठी माध्यमांच्या शाळा बंद करण्याचा निर्णय सध्याच्या राज्य सरकारने घेतला आहे. बंद करण्यात येणार्‍या शाळांपैकी अनेक शाळा पुणे जिल्ह्यातील असून त्यात बहुजन समाजाची मुले शिकतात. या शाळा बंद झाल्यास तो राज्यासाठी काळा दिवस असेल. स्मारकांची उद्घाटने केली जात आहेत, मात्र प्रत्येक्षात कामे सुरूच होत नाहीत. शाळा बंद करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास आणि स्मारकांची कामे सुरू न केल्यास संपूर्ण राज्यात रान पेटवू, असा इशारा मत खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले अशा राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांच्या स्मारकांच्या उभारणीला होत असलेला विलंब, ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय, विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या शिष्यवृत्त्या, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, कर्जमाफीचा घोळ या निर्णयांच्या निषेधार्थ लाल महालात आयोजित बहुजन अस्मिता परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य, सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, माजी आमदार उल्हास पवार, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, पी. ए. इनामदार, महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे विकास पासलकर आदी उपस्थित होते.

 तत्पूर्वी शिवाजीनगर येथील छ. शिवाजी महाराज पुतळा ते लाल महाल दरम्यान बहुजन अस्मिता मोर्चा काढण्यात आला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ज्या मराठी भाषेवर प्रेम करतो, त्याच माध्यमाच्या शाळा सरकार बंद करत आहे. दुसरीकडे काही कार्यक्रमांसाठी, जाहिरातींसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. बेटी बचाव-बेटी पढावच्या घोषणा सरकार करत आहे. मात्र, शाळा बंद झाल्यास मुली शिक्षण घेऊ शकतील का? असा सवाल त्यांनी केला. थोर व्यक्तींच्या स्मारकांबाबत केवळ घोषणा केल्या जात आहेत, शेतकर्‍यांची कर्जमाफी झालेली नाही. त्यातून सर्वसामान्यांची फसवणूक होत आहे, असा आरोप त्यांनी केला. 

हे सरकार घोषणाबाज असून रोजगारनिर्मिती, घरबांधणी, अच्छे दिनासंदर्भात वल्गना केल्या जात आहेत, अशी नाराजी भाई वैद्य यांनी व्यक्त केली, तर बहुजनांनी इतिहासात न रमता आधुनिकतेची कास धरावी, अशी सूचना बाबा आढावांनी केली. तत्पूर्वी, एसएसपीएमएस शाळेच्या मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून खासदार सुळे यांच्या नेतृत्त्वाखाली लाल महालापर्यंत बहुजन अस्मिता मोर्चा काढण्यात आला. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यावरणाविषयक आत्रापत्राचे वाचन करण्यात आले, तर सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ लाल महालात तीस मिनिटांचे मौन पाळण्यात आले.

दिल्लीच्या निर्भया प्रकरणानंतर उभा देश हादरला होता. त्यानंतर निर्भया योजनेसाठी सरकारने अर्थसंकल्पात दोन हजार कोटींची तरतूद केली होती. मात्र, त्यापैकी अवघे सहाशे कोटी रुपये खर्च झाले आहेत. अद्याप रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही लागलेले नाहीत. मनोधैर्य योजनाच सरकारने बंद केली आहे. त्यामुळे महिलांच्या छेडछाडीच्या घटना सर्रास सुरू आहेत, असा आरोपही खासदार सुळे यांनी केला.