Fri, Jun 05, 2020 03:10होमपेज › Pune › सहकारनगरातील अफरातफरीचे पोलिस दलातील तिसरे प्रकरण

सहकारनगरातील अफरातफरीचे पोलिस दलातील तिसरे प्रकरण

Published On: Feb 07 2018 1:47AM | Last Updated: Feb 07 2018 12:47AMपुणे :अक्षय फाटक  

शहर पोलिस दलातील मुद्देमाल अफरातफरीचे गेल्या आठवड्यात सहकारनगर पोलिस ठाण्यात तिसरे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ माजली. गेल्या 20 वर्षांपूर्वी पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्यातील प्रकाश विनायक भोसले (वय 48) हा  कर्मचारी पावणेदोन लाखांची अफरातफर करून फरार झाला.  शहर पोलिस दलाला काळिमा फासणारी ठाण्यातील मुद्देमाल अफरातफर होण्याची ही पहिली घटना होती. त्यानंतर अशीच आठ लाखांच्या मुद्देमालांची अफरातफर केल्याची घटना स्वारगेट पोलिस ठाण्यात 2009 मध्ये म्हणजे नऊ वषार्र्ंपूवी उघडकीस आली होती. धक्कादायक म्हणजे या प्रकरणात बदनामी होईल, या भीतीपोटी बाबूराव कोळी (वय 56) या कर्मचार्‍याने अपहाराचा प्रकार समोर येण्यापूर्वीच विष पिऊन आत्महत्या केली होती.

नुकत्याच उघड झालेल्या सहकारमधील 11 लाख रुपयांच्या अफरातफरीच्या घटनेने यापूर्वी पुणे पोलिस दलात घडलेल्या दोन कटू घटनांच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.  गेल्या 20 वर्षांपूर्वी लोहमार्ग ठाण्यातील मुद्देमाल विभागात कार्यरत असलेल्या कर्मचारी प्रकाश भोसले याने 1 लाख 68 हजारांच्या मुद्देमालांचा अपहार केला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. लोहमार्ग पोलिसांना तो सापडत नसल्याने अखेर राज्य गुन्हे अन्वेषन (सीआयडी) विभागाकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला. सीआयडीनेही जंगजंग पछाडून कर्मचार्‍यारी अद्याप सापडलेला नाही.  अशाच प्रकारची मुद्देमाल अफरातफरीची घटना 2009 मध्ये स्वारगेट पोलिस ठाण्यात घडली होती. 

 बाबूराव कोळी हे सहायक उपनिरीक्षक पदावर पुणे पोलिस दलात कार्यरत होते. स्वारगेट पोलिस ठाण्यात कार्यरत असताना त्यांच्याकडे विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला मुद्देमाल सांभाळण्याची (मुद्देमाल कारकून) जबाबदारी होती.  कोळींना दारू आणि जुगाराचे व्यसन जडले होते. त्यातच ते एक दिवस कामावरही दारूच्या नशेत आले. त्यामुळे त्यांना खात्यातून 10 जानेवारी 2009 रोजी निलंबित केले. निलंबन काळात  स्वत:कडील मुद्देमाल विभागाचा पदभार इतरांकडे सोपवण्यास त्यांना सांगितले होते. परंतु, त्यांनी तो दिला नाही.  तसेच, ते कपाटाच्या चाव्याही देत नव्हते.  याबाबत अनेक वेळा स्मरण पत्र पाठविण्यात आली. मात्र, त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. 

दारूच्या नशेत कामावर आल्याप्रकरणी कोळी यांची खात्याअंतर्गत झाल्यानंतर  दि. 22 एप्रिल 2009 रोजी ते परत रूजू झाले. दरम्यानच्या कालावधीत त्यांची बदली फरासखाना पोलिस ठाण्यात झाली. या ठिकाणी रुजू झाल्यावर वरिष्ठांनी त्यांना  पदभार सोपवण्याबाबत कारणे दाखवा नोटीस (मेमो)बजावली. तसेच पत्र व्यवहारही केला. मात्र, तरीही ते मुद्देमाल विभागाचा पदभार देत नव्हते. त्यामुळे वरिष्ठांना संशय आला. परंतु, त्यापूर्वीच 23 मे 2009 रोजी बाबूराव कोळी यांनी मुद्देमालात केलेली अफरातफर उघडकीस येण्याची आणि बदनामी होण्याच्या भीतीने विष घेऊन आत्महत्या केली. पोलिस कर्मचार्‍यानेच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने पोलिस दलात खळबळ उडाली होती. वरिष्ठांनी कोळी यांच्या मुलाकडून कपाटाच्या चाव्या घेतल्या. तसेच, मुद्देमालांची तपासणी  केली. त्यावेळी कोळी यांनी 2000 ते 2009 या काळात 8 लाख रुपयांची अफरातफर करून अपहार केल्याचे समोर आले. त्यामध्ये 5 लाख 90 हजारांची रोकड होती. त्यानंतर याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

 गेल्या आठवड्यात  सहकारनगर पोलिस ठाण्यात निवृत्त सहायक फौजदार मनोहर गंगाराम नेतेकर (वय 60, रा. आंबाई अपार्टमेंट, मारुती मंदिरासमोर, धायरी), जयवंत अमृत पाटील (वय 59, रा. भारती कॉलनी, कर्वेनगर) या दोन पोलिस अधिकार्‍यांना 11 लाख रुपयांच्या मुद्देमाल अफरातफरीप्रकरणी अटक झाली होती. तसेच एका महिला कर्मचार्‍यावरही गुन्हा दाखल झाला होता.  मागील काही वर्षांत पोलिस ठाण्यातील मुद्देमाल अफरातफरीच्या उघडकीस आलेल्या घटनांवरून  पुणे पोलिस दलात दरवर्षी  तपासणी योग्य होत नसल्याचे दिसत आहे. पोलिस ठाण्याच्या वरिष्ठांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.  त्यांनी  खबरदारी घेतल्यास असे  अफरातफरीचे प्रकार टाळले जाऊ  शकतात, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.