Wed, Aug 21, 2019 06:07होमपेज › Pune › पोलिस कर्मचारी जगतापांविरुद्धच्या खटल्याला हायकोर्टाची स्थगिती

पोलिस कर्मचारी जगतापांविरुद्धच्या खटल्याला हायकोर्टाची स्थगिती

Published On: Jan 02 2018 1:51AM | Last Updated: Jan 02 2018 1:22AM

बुकमार्क करा
 पुणे : प्रतिनिधी 

पुणे पोलिस दलातील शैलेश जगताप या कर्मचार्‍याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या खासगी खटल्याच्या कार्यवाहीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला. पुणे पोलिस दलात कार्यरत असताना त्यांच्या कारकिर्दीत शैलेश जगताप यांनी सुमारे पावणेदोनशे पिस्तूल पकडून दिले आहेत. त्यांची ओळखच गनमॅन अशी आहे. दरम्यान एका प्रकरणातील आरोपी राहुल खेत्रे याने त्यांच्याबाबत तक्रार केली होती. जगताप यांनी आपल्याला बेकायदेशीरपणे ताब्यात घेत डांबून ठेवले आणि त्यानंतर आपल्याकडे खंडणीची मागणी केली असा आरोप करत त्याने पुण्यातील न्यायालयात  खासगी दावा दाखल केला होता. 

दावा दाखल केला तेव्हा शैलेश जगताप हे गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकात नियुक्तीस होते. त्यावेळी न्यायालयाने हा खटला दाखल करून घेत त्याच्या पुढील कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर शैलेश जगताप यांनी या दाव्याविरोधात उच्च न्यायालयात अ‍ॅड. सत्यव्रत जोशी यांच्यामार्फत अपील दाखल केले होते. त्यानंतर न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.  अ‍ॅड. जोशी यांनी शैलेश जगताप यांनी पोलिस दलात चांगली कामगिरी केली असून त्यांच्या कारकिर्दीत सुमारे पावणेदोनशे पिस्तूल त्यांनी पकडून दिले आहेत. त्यांनी आजवर केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांना अनेक बक्षीसे मिळली असून खेत्रे याने ही कथा रचलेली आहे,  असा युक्तीवाद केला. युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्यांच्यावरील खटल्याला स्थगिती दिली.