Sun, Jul 21, 2019 08:20होमपेज › Pune › बँके कर्मचार्‍यांनीच पैसे लाटले

बँके कर्मचार्‍यांनीच पैसे लाटले

Published On: Dec 13 2017 2:46AM | Last Updated: Dec 13 2017 1:37AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

बनावट सह्या करून महिलेच्या  रिकरिंग खात्यातून  सहा लाख 36 हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार कराड अर्बन सहकारी बँकेच्या सहकारनगर शाखेत उघडकीस आला आहे. हा प्रकार 2012 ते 2017 या कालावधीत घडला. याप्रकरणी हेमलता भालेराव (53, पौड रोड) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार रिकरिंग एजंट गणेश शिंदे (एरंडवणा) व कराड अर्बन सहकारी बँकेच्या कर्वेनगर शाखेतील कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांची कोथरूड येथील नामांकित लॉजमध्ये भागीदारी आहे. त्यांच्या पतीचे 2012 साली एप्रिलमध्ये निधन झाले.  तेव्हापासून त्या बँकेचा एजंट गणेश शिंदे याच्या माध्यमातून बँकेत पैसे भरत आहेत. शिंदे याने बँकेतील कर्मचार्‍यांशी संगनमत करून 22 जून 2012 रोजी भालेराव यांची खोटी स्वाक्षरी केली आणि  त्यांच्या रिकरिंग खात्यातील 6 लाख 36 हजार 606 रुपयांची रक्कम त्यांच्याच सेव्हींग खात्यामध्ये वर्ग केली. कराड अर्बन सहकारी बँकेच्या कर्वेनगर शाखेतही त्यांचे खाते आहे.

या खात्यात त्यांच्या व्यवसायातील काही पैसे जमा होते.  त्यानंतर 4 सप्टेंबर 2012 रोजी ही सेव्हींग खात्यातील रक्कम पुन्हा खोटी स्वाक्षरी करून काढून घेतली. भालेराव यांच्या लक्षात ही बाब आल्यावर त्यांनी कोथरूड पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र, बँकेच्या अधिकार्‍यांनी याचा इन्कार केला आहे. तसेच पैसे त्यांनी स्वत: काढले असल्याचा दावा केला आहे, अशी माहिती उपनिरीक्षक दिगंबर जाखडे यांनी दिली.