Thu, Jun 20, 2019 20:43होमपेज › Pune › पुणेकरांवर 15 टक्के कराचा बोजा

पुणेकरांवर 15 टक्के कराचा बोजा

Published On: Jan 03 2018 1:16AM | Last Updated: Jan 03 2018 12:23AM

बुकमार्क करा
पुणे ः प्रतिनिधी 

विविध कारणांसाठी महापालिकेच्या उत्पन्नात वरचेवर घट होत आहे. त्यामुळे नियोजित विकासकामांना कात्री लावण्याची वेळ प्रशासनावर येत आहे. राज्य शासनानेही पालिकेने उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुणेकरांकडून वसूल केला जाणारा मालमत्ता कर आणि पाणीपट्टीमध्ये 15 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीसमोर ठेवला आहे. त्यामुळे पुणेकरांवर पालिकेला द्याव्या लागणार्‍या कराचा बोजा  वाढणार आहे. 

यासंबंधीच्या प्रस्तावावर मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार होता. मात्र, मंगळवारी होणारी स्थायीची बैकठ तहकूब करण्यात आली. त्यामुळे या प्रस्तावावर निर्णय झाला नाही. स्थायीच्या पुढील बैठकीत या प्रस्तावावर निर्णय होणे अपेक्षित असून, या प्रस्तावास स्थायीने मंजुरी दिल्यास मालमत्ता करातून 135 कोटी रुपये आणि पाणीपट्टी वसुलीतून 19 कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहेत.   दुसरीकडे महागाईने त्रस्त असलेल्या पुणेकरांवर आणखी कराचा बोजा वाढणार आहे. 

हा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला असून, स्थायीकडून हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेवला जाणार आहे. या वाढीस सर्वसाधारण सभेत विरोधकांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी बहुमताच्या जोरावर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक याला मंजुरी देतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.