होमपेज › Pune › मुबलक कोट्यामुळे साखरेचे भाव उतरले

मुबलक कोट्यामुळे साखरेचे भाव उतरले

Published On: Sep 03 2018 1:41AM | Last Updated: Sep 03 2018 1:22AMपुणे : प्रतिनिधी

केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यासाठी 20 लाख टन आणि निर्यात केलेल्या साखरेइतकाच संबंधित कारखान्यांना देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी दिलेला 2 लाख टन मिळून, एकूण 22 लाख टनांचा कोटा जाहीर केला आहे. या निर्णयाने कोटा मुबलक प्रमाणात झाल्याने साखरेचे भाव 50 रुपयांनी उतरले असून, शनिवारी सायंकाळी एस् 30 ग्रेड साखरेचा क्विंटलचा भाव 3200 ते 3250 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. 

गौरी-गणपतीच्या सणामुळे साखरेला चांगली मागणी राहण्याची अपेक्षा व्यापार्‍यांकडून व्यक्त होत आहे. मात्र, देशातील साखरेचा मुबलक शिलकी साठा आणि पुढील हंगामातही होणार्‍या अपेक्षित विक्रमी उत्पादनामुळे बाजारपेठेवर दबाव आहे. याशिवाय घाऊक बाजारपेठेत साखरेला तुलनेने मागणी कमी असल्याने भाव मंदीकडे झुकण्याचा प्राथमिक अंदाज व्यापार्‍यांकडून व्यक्त होत आहे. मुबलक कोट्यानंतर साखरेच्या निविदाही क्विंटलमागे 25 ते 50 रुपयांनी घटून 2975 रुपयांपर्यंत खाली आल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली. केंद्र सरकारने साखरेच्या घसरत्या भावाला आळा घालण्यासाठी तीन महिन्यांपुर्वी ज्या काही उपाययोजना लागू केल्या, त्यामध्ये साखरेची दरमहा कोटा पध्दत सुरु केली. तसेच साखरेचा क्विंटलचा भाव 2900 रुपये निर्धारित केला. त्यापेक्षा कमी भावात साखरेची विक्री करण्यास साखर कारखान्यांना मनाई करण्यात आली. 

केंद्राच्या उपाययोजनांच्या परिणामांमुळे साखरेचे भाव सातत्याने वाढून शेतकर्‍यांच्या एफआरपीची रक्कम देण्यास कारखान्यांना भरीव फायदा झाला. याशिवाय साखर निविदा उंचावत राहिल्याने घाऊक बाजारात क्विंटलचे भाव 3300 ते 3350 रुपयांपर्यंत पोहोचले. सप्टेंबर महिन्यासाठी मुबलक कोटा जाहिर झाल्यानंतर निविदांचे दर घसरले आणि बर्‍याच दिवसानंतर निविदा क्विंटलला तीन हजार रुपयांच्या खाली आलेल्या आहेत. साखरेचा खप गणेशोत्सवाच्या सणानंतर कमी झाल्यास मागणी घटून निविदा केंद्राने निर्धारित केलेल्या 2900 रुपये क्विंटलच्या दराजवळ येण्याची शक्यता बाजारपेठेतील जाणकार सुत्रांकडून व्यक्त होत आहे. त्यावेळी या विषयात केंद्र सरकारला पुन्हा हस्तक्षेप करावा लागणार असल्याचे चित्र आहे.