Fri, Apr 26, 2019 01:35होमपेज › Pune › विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्य दिन जुन्याच गणवेशात

विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्य दिन जुन्याच गणवेशात

Published On: Aug 15 2018 1:21AM | Last Updated: Aug 15 2018 1:21AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना यावर्षी थेट हस्तांतरण योजनेंतर्गत (डीबीटी) गणवेश आणि शालेय साहित्य खरेदीसाठी खात्यावर थेट पैसे जमा केले.  मात्र, बाजारात गणवेश सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे जवळपास निम्म्या विद्यार्थ्यांना यंदाचा स्वातंत्र्य दिन जुन्याच गणवेशांवर साजरा करावा लागणार आहे.

विद्यार्थ्यांच्या साहित्य वाटपातील गैरव्यवहार रोखण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार महापालिकेने यावर्षी डीबीटी योजना राबविली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या पालकांची बँक खाती उघडून त्यावर विद्यार्थ्यांना गणवेश आणि साहित्य खरेदीसाठी लागणारी रक्कम जमा करण्यात आली.  पालिका प्रशासनाने केलेल्या दाव्यानुसार आत्तापर्यंत 94 टक्के विद्यार्थ्यांपर्यंत ही रक्कम पोहचली आहे.  याबाबत दै.‘पुढारी’ने केलेल्या पाहणीत विद्यार्थ्यांपर्यंत पैसे पोहचले असले तरी गणवेशाची खरेदी मात्र होऊ शकली नसल्याचे आढळून आले आहे. जवळपास 50 टक्के विद्यार्थ्यांना अद्यापर्यंत नविन गणवेश मिळालेले नाही. मंडळाने यावर्षी डीबीटी राबविली मात्र, गणवेश हा गतवर्षीचाच ठेवला आहे. हा गणवेश बाजारात सहजरीत्या उपलब्ध होत नाही. तो शिवूनच घ्यावा लागत आहे. त्यामुळे गणवेश खरेदीत विद्यार्थ्यांना अडचण येत आहे. त्यामुळे आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना गणवेश मिळू शकलेला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना यावर्षी नवीन गणवेशाशिवायच स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागणार आहे.