Mon, Sep 24, 2018 18:55होमपेज › Pune › वाहक नसल्याने प्रवास धोकादायक

वाहक नसल्याने प्रवास धोकादायक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या पीएमपीच्या बसमध्ये वाहक नसल्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. मागील कित्येक वर्षांपासून या बसेस विनावाहक चालविण्यात येत असल्याची बाब उघडकीस आली आहे. शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी पीएमपी प्रशासनाने सुमारे पन्नास बसेसची सोय केली आहे. मात्र सुरक्षेसाठी वाहक नेमणे अपेक्षित असताना, प्रशासनाने सर्व नियम पायदळी तुडवीत कित्येक वर्षापासून या वाहकाची नेमणूकच केलेली नाही. शालेय विद्यार्थ्यांंंचा प्रवास तसेच त्यांच्या शिक्षणाचा खर्च महापालिका प्रशासन करीत आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांना घरापासून शाळेपर्यंत आणि पुन्हा शाळेपासून घरापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पीएमपी प्रशासनाकडे आहे. 

शाळेसाठी नेमून देण्यात आलेल्या बसेसवर एक चालक आहे.  मात्र प्रत्येक बसवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी एक वाहक देणे गरजेचे आहे. चालक बस चालवीत असताना कित्येकदा बसमधील मुले गोंगाट करीत असतात. तसेच काही जण तर बसच्या दरवाजात उभे असतात. अशा वेळी चालकास विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे जमत नाही. गर्दीच्या वेळी चालकास बस चालविण्यावर लक्ष देणे जास्त गरजेचे असते. विद्यार्थ्यांच्या बसमधील गोंधळामुळे कधी कधी अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन पीएमी प्रशासनाने वाहकाची नेमणूक करावी, अशी मागणी शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी केली आहे.
 


  •