Tue, Jul 23, 2019 06:18होमपेज › Pune › विकास सोसायट्यांना  कर्जमाफीमुळे जीवदान

विकास सोसायट्यांना  कर्जमाफीमुळे जीवदान

Published On: Jan 14 2018 1:54AM | Last Updated: Jan 14 2018 1:19AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

जिल्ह्यात 1 हजार 369 सहकारी सोसायट्या कार्यरत असून, आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये एकूण 375 सोसायट्या आर्थिक अडचणीत असल्याचे स्पष्ट झालेेले आहे. त्यामागे कर्जवसुली न होणे, शेतमालास वाजवी भाव न मिळाल्याने रक्कम भरण्याची शेतकर्‍यांची परिस्थिती नसणे आणि कर्जच न भरण्याच्या पवित्र्यांमुळे सोसायट्या तोट्यात जाण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतून मिळालेल्या रकमेमुळे अडचणीतील विकास सोसायट्यांना जीवदान मिळाल्याचे सहकार विभागातून सांगण्यात आले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून विकास सोसायट्यांमार्फत शेतकर्‍यांना पीक कर्जाचे वाटप होते.  मागील दोन वर्षे दुष्काळाची स्थिती राहिली. तसेच पुणे जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकर्‍यांकडून कर्जाची परतफेड होण्यास अडचणी येत नाहीत. मात्र, टोमॅटोसह उर्वरित अन्य पिकांसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड विविध कारणांनी वेळेत केली जात नाही. त्यामुळे थकीत कर्जाचे प्रमाण व त्यावरील व्याजाची रक्कम वाढून विकास सोसायट्या आर्थिक अडचणीत आल्याचे समोर आलेले आहे. लेखापरिक्षण अहवालावरून ही माहिती पुणे जिल्हा उपनिबंधक ग्रामीणच्या कार्यालयातून मिळाली. 

जिल्ह्यात  1 हजार 340 प्राथमिक शेती पतपुरवठा संस्था आहेत. तर, आदिवासी भागातील शेतकर्‍यांना 26 प्राथमिक आदिवासी शेती पतसंस्थेकडून, तर 3 कृषक सेवा सहकारी सोसायट्या मिळून एकूण संख्या 1 हजार 369 इतकी आहे. जिल्हा उपनिबंधक पुणे ग्रामीण कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार इंदापूर तालुक्यात सर्वाधिक सहकारी सोसायट्या तोट्यात राहिल्या आहेत. ही संख्या 71 असून, त्याखालोखाल भोर तालुक्यात 54, शिरूर 53, दौंड 50, बारामती 40, हवेली 35, पुरंदर 20, मावळ 18, वेल्हे 15, खेड 11, मुळशी 5, आंबेगाव तालुक्यातील 3 मिळून एकूण 375 सोसायट्यांचा समावेश आहे.